'आरपार' देखोगे तो लाईफ और भी इंटरेस्टिंग लगेगी! देखो मगर प्यार से… मराठी मनाचा मनाचा स्ट्रिंगफोन… आरपार बघा ‘विषय’ एन्ड करा !!
  • Home
  • About Us
  • Videos
  • Blogs
  • Events
  • Contact Us
...
...

Forensic Accountant म्हणजे काय? Fraud Refund Success Rate का कमी आहे? – अपूर्वा जोशी यांची कहाणी

Jul 08, 2025

डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक हे पारंपरिक व्यवसाय आपल्याला परिचित आहेत. पण एक असा व्यवसाय आहे जो थोडा अनोखा, थोडा रहस्यमय आणि खूपच गरजेचा आहे – तो म्हणजे Forensic Accounting! याच क्षेत्रात काम करणाऱ्या आणि अनेक आर्थिक फसवणुकींचा छडा लावणाऱ्या अपूर्वा जोशी यांचा अनुभव ‘आरपार’ च्या Woman Ki Baat या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळतो. अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी त्यांच्याशी घेतलेला हा संवाद खूप माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा ठरतो.

फॉरेन्सिक अकाउंटंट म्हणजे फक्त हिशेब तपासणारा नव्हे, तर फसवणुकीचे जाळं उकलणारा शोधक असतो. अपूर्वा जोशी ही अशीच एक संशोधक – जी केवळ अकाऊंट बघत नाही, तर प्रत्येक आर्थिक व्यवहारामागे दडलेली खरी गोष्ट शोधते. ती कोणत्या कागदपत्रांवर संशय घ्यायचा, कोठे घोळ झाला आहे, कोणाला फायदा झाला आहे – हे सगळं बारीकसारीक तपशीलांसह शोधून काढते.

आज अपूर्वा Riskpro या नामवंत संस्थेची भागीदार आहे. ती देशभरातील कंपन्यांसाठी forensic audit, Anti-Money Laundering (AML) तपास, आणि fraud investigation यामध्ये मार्गदर्शन करते. तिचं काम अनेकदा खूप संवेदनशील असतं – कारण ती ज्या प्रकरणांवर काम करते, त्यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा लपलेला असतो. त्यामुळे ती फक्त एक अकाउंटंट नसून, ती एक प्रकारची गुप्तचर आहे असंही म्हणता येईल.

या पॉडकास्टमध्ये अपूर्वा जोशीने आपली शैक्षणिक वाटचाल, पहिली नोकरी, आणि या क्षेत्रात कसं पाऊल टाकलं हे सविस्तर सांगितलं. सुरुवातीला तिला हिशेब शिकण्यात रस होता, पण जसजसा वेळ गेला, तसं तिला आर्थिक फसवणूक कशी होते, ती ओळखायचं कसं, पुरावे कुठून मिळवायचे, आणि कायद्यानं त्याचा पाठपुरावा कसा करायचा – याकडे अधिक आकर्षण वाटू लागलं.

तिनं उदाहरणं देऊन सांगितलं की काही वेळा एक लहानसा एक्सेल शिटचा फॉर्म्युला बदलला जातो, आणि त्यातून लाखोंचा घोटाळा होतो. या छोट्या क्लूज तिला शोधून काढायचे असतात – तेही अत्यंत बारकाईने आणि पुराव्यानिशी.

या संवादात PNB Fraud (पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा) याचा खास उल्लेख करण्यात आला. देशभर गाजलेल्या या प्रकरणात फसवणुकीचे जाळं किती खोल आहे, आणि अशा प्रकरणांमध्ये Forensic Accountant ची भूमिका किती महत्त्वाची असते, हे अपूर्वाने अतिशय सोप्या भाषेत समजावलं.

त्यानंतर विषय निघाला Multilevel Marketing Fraud चा. MLM स्कीम्स कशा आकर्षक वचनं देऊन लोकांना फसवतात, यावर ती म्हणाली की “मोठा फायदा, कमी वेळात” असं जेव्हा कुठे ऐकायला मिळतं, तेव्हा तिथे शंकेची जागा असते. ती म्हणाली की MLM आणि Ponzi Schemes हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत – आणि अशा प्रकारांपासून तरुणांनी विशेषतः सावध राहायला हवं.

या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा अपूर्वाने मांडला – तो म्हणजे Fraud Refund Success Rate in India. ती म्हणाली की भारतात फसवणुकीनंतर पैसे परत मिळण्याचा दर खूपच कमी आहे. कारणं अनेक आहेत –

  1. आपल्याकडे कायदेशीर प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे,

  2. अनेकदा लोक पुरावे गोळा करत नाहीत किंवा रिपोर्ट करत नाहीत,

  3. पोलीस आणि सायबर यंत्रणांकडे देखील मर्यादित संसाधनं आहेत,

  4. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – लोकांना माहितीच नसते की कुठे तक्रार करायची.

त्यामुळे ती सांगते की प्रत्येकाने स्वतः जागरूक राहणं आणि आपल्या आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता राखणं आवश्यक आहे.

या एपिसोडमध्ये अपूर्वाने तरुणांसाठी एक मार्गदर्शनात्मक दृष्टिकोनही दिला. तिनं सांगितलं की Forensic Accounting, AML, Risk Management अशा क्षेत्रांत आता चांगल्या संधी आहेत. यासाठी खास कोर्सेसही उपलब्ध आहेत – जे कोणतंही कॉमर्स किंवा फायनान्सचं शिक्षण घेतलेलं व्यक्ती करू शकतं. तिला विश्वास आहे की पुढील काही वर्षांत या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना खूप मोठी मागणी असेल.

‘Woman Ki Baat’ मधील प्रत्येक भागात वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांचा प्रवास उलगडून दाखवला जातो. या भागात अपूर्वा जोशीने आपला प्रवास, तिचं काम, आणि समाजासाठी तिचं योगदान अतिशय स्पष्टपणे मांडलं. हे केवळ तिचं यश नव्हे, तर या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

या पॉडकास्टमध्ये केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर समाजातल्या महिलांचं योगदान, त्यांच्या क्षेत्रातील भूमिका, आणि नव्या वाटा शोधण्याचा त्यांचा आत्मविश्वास याचीही छान झलक मिळते.

तुम्हीही हा एपिसोड नक्की पाहा – आणि तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात उपयुक्त वाटली ते आम्हाला comment box मध्ये जरूर कळवा!

 

Read More

“Dementia रुग्णापेक्षा घरच्यांना छळतो”

Apr 11, 2025

“Dementia रुग्णापेक्षा घरच्यांना छळतो” 

असं म्हणतात की माणसाला या पृथ्वीवर इतर जीवजंतूंपासून वेगळे बनवतं ते म्हणजे त्याचं डोकं. विचार करण्याची क्षमता निसर्गाने फक्त माणसाला दिली. सातत्याने स्वतःमध्ये बदल करत करत पृथ्वीवरचा सगळ्यात बलशाली जीव आज माणूस आहे, तोही फक्त त्याच्या बुद्धीच्या जोरावर. पण निसर्गाने एक छोटासा loophole त्यात सोडला! कमाल आहे खरंच, इतकी तीक्ष्ण बुद्धी, डोक्यातल्या विचारांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. पण याच बुद्धीला विस्मृती सुद्धा दिली.

एकाच वेळी कसं निसर्गाने माणसाला ब्रह्मत्व आणि लाचारी दिली असेल. याच विस्मृतीचा अतिरेक झाला की त्याला Dementia असं म्हणतात. हा एक आजार आहे जो बरा होत नाही. या आजाराच्या अंतर्गत अनेक आजार आहेत - Alzheimer's, Lewy Body Dementia, Vascular Dementia इत्यादी. स्मिता अभ्यंकर या counselor आणि psychologist आहेत. स्मिता गेल्या अनेक वर्षांपासून Alzheimer's च्या रुग्णांची counseling करतात आणि त्यांच्या अडचणी समजून त्यांचा पॅटर्न समजून घेतात, जेणेकरून त्या रुग्णांच्या घरच्यांना मार्गदर्शन करू शकतील रुग्णाची काळजी घेण्यात. कारण ह्या आजारात रुग्ण स्वतःच्या घरच्यांनाही ओळखणं बंद करतो, म्हणून त्यांची काळजी घेणं अजून कठीण होऊन जातं.स्मिता अभ्यंकर यांनी 'आरपार' कॅफेवर झालेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. नेमका हा Alzheimer’s असतो काय, ह्याला कसं ओळखावं, अनेक गोष्टी. ह्या आजारात रुग्ण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखणं बंद करतो. बऱ्याचदा असं होतं की फक्त जुन्या आठवणी लक्षात राहतात आणि वर्तमानातील गोष्टी लक्षात राहत नाहीत. हा आजार बहुधा वृद्धावस्थेत होतो. पण स्मिता अभ्यंकर म्हणतात की हल्ली हे होण्याचं वय हळूहळू कमी होत आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे. ह्या आजारात रुग्णापेक्षा त्यांचे घरचे खूप काही सहन करतात, त्यामुळे त्यांच्या घरच्यांना धीर देणं आणि संपूर्ण माहिती देणं हे गरजेचं असतं, असं स्मिता म्हणतात. मुळात हा आजार इतर आजारांसारखा नाही, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. ह्यात रुग्ण चालतो, बोलतो, पण कोणत्या क्षणी काय करेल, कोणाला आपलं मानेल किंवा कोणाला घाबरेल, ह्याचा नेम नसतो. ह्या आजारात रुग्णांना भास होतात, ते स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करून त्यात राहत असतात, आणि जर आपण त्यांच्या एखाद्या गोष्टीचा विरोध केला तर ते कसं वागतील ह्याचा काही अंदाज नसतो. ही पूर्णपणे मानसिक स्थिती आहे, पण बहुधा लोक ह्यांना वेडं समजायला लागतात. आणि त्यांच्या ह्या वागण्यामुळे त्यांना मानसिक रोगी समजून त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होतात आणि खूप उशिरा हे कळतं की त्यांना Dementia आहे.

https://youtu.be/8rp0ANPd-mE?si=IkflaIQN0szs8FDN

मुलाखतीत स्मिता अभ्यंकर यांनी बरेच किस्से सांगितले की हे रुग्ण कसं वागतात, जर चिडले तर काय काय करतात. पण ह्या रुग्णांकडे कोणी लक्ष देत नाही, ह्याची खंत व्यक्त करत स्मिता म्हणतात की अशा रुग्णांच्या घरचे त्यांना वैतागून शेवटी शेवटी त्यांना ऐकत सोडून देतात. आणि ह्या रुग्णांना सगळ्यात जास्त धोका एकटं राहण्यापासूनच आहे. त्या सांगतात की lockdown मध्ये त्यांनी बरेच रुग्ण गमावले फक्त एकटे पडल्यामुळे. ह्या आजाराचा उपाय नाही, आपण या आजाराला पूर्णपणे बरं करू शकत नाही, पण कमीत कमी आपण रुग्णासोबत थोडा वेळ घालवू शकतो. त्यांना काय हवं-नको, त्यांची काळजी घेऊ शकतो. विस्मृती त्यांना झालीय, पण आपल्या तरी लक्षात आहे ना! हा आजार झालेली व्यक्ती माझी आई आहे, बायको आहे, किंवा वडील आहेत, कोणीही असू शकतं.हीच गोष्ट समजावण्यासाठी स्मिता अभ्यंकर आणि त्यांच्या दोन मैत्रिणी मिळून हे काम करत आहेत. ह्या आजारात रुग्णांच्या घरच्यांना ते तयार करतात ह्या आजाराशी दोन हात करायला. त्यांचं असं म्हणणं आहे की मानसशास्त्रात कधीच वृद्ध व्यक्तींच्या मानसिकतेकडे किंवा त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. 

वय वाढलं की विसरायला होतंच, असा समज होऊन बसला आहे. पण ह्यामुळेच Dementia सारखा आजार लवकर निदर्शनास येत नाही आणि ह्यामुळेच पुढे अजून अडचणी वाढतात. एकंदरीत ह्या विषयाचा सार एवढाच आहे की एक तर कोणत्याही प्रकारचा Dementia दुर्लक्ष करू नका, आणि ह्या आजाराच्या रुग्णांसोबत शक्य तितकं नरम वागा. त्यांना वेळ द्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं... अशा अवस्थेत रुग्ण एकटे पडणार नाहीत, ह्याची काळजी घ्या.ह्या आजाराबद्दलची अजून माहिती मिळवायची असेल तर 'आरपार' YouTube चॅनेलवर ही संपूर्ण मुलाखत नक्की बघा.

Read More

बाजीप्रभू जिवंत करणारे अजय पूरकर

Mar 25, 2025

आपल्या अभिनयाने बाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा पुन्हा जिवंत करून समस्त महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणणारे अभिनेते अजय पुरकर यांची अजून काही विशेष ओळख सांगणं काही गरजेचे नाही.अभिनय करून लोकांच्या मनावर छाप सोडणारे कित्येक कलाकार आहेत.पण ह्या माणसाकडे आयुष्य जगणायची एक वेगळीच Clarity आहे जी की प्रचंड सकारात्मक आहे. विविध भूमिकांतून विविध रंग उधळणारा अभिनेता माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायची संधी आरपारला लाभली.

अजय पूरकर यांचा संपूर्ण एपिसोड पाहण्यासाठी 
https://youtu.be/iBfDYJUuCIc

अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये यांच्या भूमिका आपण पाहिल्या आहेत पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही विशेष मुद्द्यांवर त्यांचे मत काय आहेत हे आपण या मुलाखतीत जाणून घेतलं आहे, लग्न व्यवस्थेत ज्या अडचणी आहेत, कशा अपेक्षा वाढत चाललेले आहेत आणि त्यातून निर्माण होणारे वाद कसे टोकाला जातात. कमावणाऱ्या बाईला attitude येणं स्वाभाविक आहे असं ही ते म्हणाले. पण आधीच्या काळा पासून ते आज पर्यंत गोष्टी कशा बदलत गेल्या हे त्यांनी खूप छान समजावून  सांगितलं आणि या झालेल्या बदलाचे एक सकारात्मक घटक होणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. समाजात बदलत गेलेल्या गोष्टींमध्ये फक्त नवरा बायकोच नातंच नाही तर पालकत्व, इतर नाते संबंध ही आहेत ह्याची त्यांनी आठवण करून दिली. पालकांनी वयात येणाऱ्या मुलांना कसं हाताळलं पाहिजे ह्यावर त्यांनी खूप रोचक असे उदहारण देऊन समजावलं. आजची पिढी किती समृद्ध आहे हे सांगत असताना त्यांनी आजच्या पिढीला घाई सुद्धा तितकीच आहे याची काळजी व्यक्त केली. ह्याच सोबत त्याच्या तरुणपणीचे काही मजेशीर किस्से सुद्धा नाही आरपारच्या दर्शकांसाठी सांगितले.

 

पुरुष म्हणून समाजात वावरताना कसं भाण राखून जगलं पाहिजे ह्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. 'आपल्या ताकदीचा गाजावाजा न करता डोकं शांत ठेवणे हीच मर्दानगी असते' असा सल्ला त्यांनी समाजाला दिला. तरुण पिढीने कसं आपलं काम सातत्याने केलं पाहिजे आणि instant results च्या मागे पळू नये ह्याची समज दिली. बाहेरून जस मजा मस्तीमध्ये पुरुषांचं आयुष्य दिसत अगदी तसं ते नाही, त्या व्यतिरिक्त सुद्धा पुरुषांच्या आयुष्याचे अनेक बाजू आहेत हे त्यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या बोलण्यावरून एका गोष्टीची जाणीव मात्र नक्की होते कि खरंच .... "पुरुष हा स्वातंत्र्याच्या बंधनात असतो" पण इतकं असूनही आयुष्य कसं जगावं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, ह्याची शिकवण अजय पुरकर ह्यांनी त्यांच्या शैलीत दिली आहे. 

एक कमाल आणि बिनधास्त माणूस ज्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच निराळा आहे. एखाद्या माणसानं वैचारिक दृष्ट्या किती क्लिअर असावं हे त्यांच्या बोलण्यातून समजून येतं. आयुष्याचे बरेच महत्त्वाचे धडे खूप मजेशीर पद्धतीने त्यांनी शिकवले आहेत. 
फक्त वाचून हा विषय सोडू नका, संपूर्ण व्हिडिओ आरपार चॅनेल वर नक्की बघा.....
मग  समजून जाईल की इतक्या सहजपणे मनोरंजनातून ही आयुष्याची शिकवण देता येते.

Read More

CA RACHANA RANADE : Financial Decision फक्त पुरुषच घेऊ शकतात, हे कोणी ठरवलं?

Dec 16, 2024

लहानपणी आपण आई- वडिलांना हिशोबाची वही Maintain करताना बघितलेलं असतं! पैशांची गुंतवणूक करताना सोनं, घर खरेदी, एखादी RD अशाही गोष्टी बघितलेल्या असतात, पण खरंच आर्थिक गुंतवणूक एवढीच असते का? सोन्यात, घरात गुंतवणूक करणं हे फायद्याचं आहे का? की सध्याचे trends बघता यापेक्षा वेगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे? 

पैशांचं गणित आपण आपल्या बजेटमध्ये योग्यप्रकारे कसं बसवू शकतो, कोणत्या गोष्टींमधील गुंतवणूक ही अधिक फायदेशीर असते अशा सगळ्या विषयांवर आरपार युट्युब चॅनेलच्या 'वुमन की बात' segment मध्ये आपण गप्पा मारल्या आहेत CA रचना रानडे हिच्याशी! 

एपिसोड बघण्यासाठी Woman ki Baat with CA RACHANA RANADE 

रचनाला तुम्ही युट्यूबवर अनेकवेळा ऐकलं असेलच. स्टॉक मार्केट, इन्व्हेस्टमेंट, शेअर्स अशा अनेक विषयांवर ती कायमच उत्तम मार्गदर्शन करते. प्रत्येक क्षेत्रात आज स्त्री आघाडीवर आहे, पण finance च्या बाबतीत आजही महिला पिछाडीवरच दिसतात. महिलांनी Financial Management जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे, याविषयी तिने ठोस मत व्यक्त केलंय. 

"घरात कामांची विभागणी केली जाते, तेव्हा अनेकदा पुरुषांनी financial decision घ्यावेत असं म्हटलं जातं. यात काहीच गैर नाहीये, पण प्रत्येक स्त्री निर्णयांबाबत सजग असणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक घरांमध्ये स्त्रियांना आर्थिक बाबी माहितीच नसतात, जे मला अत्यंत चुकीचं वाटतं" असं रचना म्हणते. 

आर्थिक गुंतवणुकींसोबतच गरज व हव्यास, खरेदी - विक्री करतानाच approach अशा विविध पैलूंवर रचना अगदी दिलखुलासपणे व्यक्त झाली आहे. "आताची पिढी खूप lucky आहे. सुदैवाने बेसिक गरज भागवण्यासाठी त्यांना पैसे कमवायची गरज नाहीये. त्यांची आवड हेच त्यांचं पैसे कमावण्याचं साधन होऊ शकतं, पण यात पालकांवर खूप मोठी जबाबदारी आहे. मुलांना कमी वयात पैशांची किंमत, savings ची सवय लावली पाहिजे" असंही ती म्हणाली. 

शॉपिंग हा सगळ्यांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कळत नकळत अनावश्यक गोष्टींमध्ये आपण किती पैसे खर्च करतो, हे आपल्याला समजतच नाही. पैसे नको त्या ठिकाणी वाया न घालवता त्यांची साठवणूक कशी करता येईल, याबाबतही रचनाने खूप छान मार्गदर्शन केलंय. आता ते नेमकं काय, यासाठी तुम्हाला एपिसोड बघावा लागेलच.

Read More

समान नागरी कायदा ! पुन्हा चर्चेत..

Jun 24, 2023

समान नागरी कायदा !

पुन्हा चर्चेत..

भारताच्या २२ व्या विधी आयोगानं पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर नागरिकांची मतं मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ३० दिवसांत सर्वसामान्य नागरिकांना आपली मतं नोंदवण्यास सांगण्यात आलं आहे. २०१६ ते २०१८ मधील २१ व्या विधी आयोगानं आपल्या अहवालात देशात सध्या समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज किंवा स्थिती वाटत नाही, असं नमूद केलं होतं. मात्र, विधी आयोगाचे अध्यक्ष असलेले कर्नाटक हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांनी पुन्हा याच्या परीक्षणाची गरज असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार, त्यांनी पब्लिक नोटीस काढून देशातील सर्वसामान्य जनतेची समान नागरी कायदा लागू करण्याबाबतची मत जाणून घेण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये विविध संघटना विशेषतः धार्मिक संघटनांना ३० दिवसांत याबाबतची मतं पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकार आग्रही आहे, त्यामुळं याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

समान नागरी कायद्याबद्दलच्या चर्चेत कायद्यातील तरतुदी आणि त्यांचा भारतासारख्या विभिन्नतेने संपन्न देशातील नागरिकांवर नेमका काय परिणाम होईल यापेक्षा धार्मिक ध्रुवीकरण वाढवणारीच चर्चा अधिक होते. राजकीय चष्म्याच्या पलीकडे जाऊन या कायद्यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. अर्थात याचं प्रमुख कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा. त्यामध्ये कलम ३७० हटविणे , देशभरात समान नागरी कायदा अमलात आणणे अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचेही दिसते आहे. या पॉडकास्टमध्ये आपण नेमका कायदा काय याबद्दल थोडक्यात समजून घेऊयात.

सामान नागरी कायदा काय आहे?

भारतीय राज्यघटनेतील कलम १४ प्रमाणे सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. घटनेनुसार सरकार किंवा शासन व्यवस्थेला कोणत्याही नागरिकास कायद्यातील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारता येणार नाही. याशिवाय घटनेतील कलम १५ नुसार सरकार किंवा शासन व्यवस्थेला कोणत्याही नागरिकामध्ये धर्म, वंश, जात, लिंग याआधारे भेद करता येणार नाही.

आज भारतात मुस्लीम, ख्रिश्चन आणि पारशी या समाजांसाठी स्वतंत्र वैयक्तिक कायदे अस्तित्वात आहेत. तसेच हिंदू सिव्हिल-लॉ अंतर्गत हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध समाजांचा समावेश आहे. त्यात वेगवेगळ्या तरतुदी आहेत उदाहरणार्थ मुस्लीम पर्सनल-लॉ मध्ये महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर पुरेसा अधिकार नाही. समान नागरी कायदा लागू झाल्यास लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटप यांसारख्या अनेक तरतुदींवर सर्वांसाठी समान कायदे लागू होतील.

यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच जर समान नागरी कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल.

कायद्याच्या चर्चांचा इतिहास

सर्वोच्च न्यायालयात १९८५, १९९५ व २००३ मध्ये वेगवेगळ्या प्रकरणांच्या न्याय -निवाड्यांमध्ये समान नागरी कायदा अमलात आणावा, असे भारत सरकारला निर्देश दिलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सामाजिक अभिसरणसाठी अशा कायद्याची गरज असल्याचे सूत्र सर्वोच्च न्यायालयाच्या वरील सर्व निवाड्यांतून स्पष्ट होताना दिसते. घटनाकारांना समान नागरी कायदा करण्याची तरतूद घटनेमध्ये का करावी लागली याचा विचारही आज महत्त्वाचा ठरतो.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशाच्या स्वातंत्र्या बरोबरच सामाजिक सुधारणेची व समानतेची चळवळ चालू होती. स्त्रीदास्य मुक्तीही या चळवळीचे एक महत्त्वाचे अंग होते. स्त्रीदास्य ही हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मांतील धार्मिक प्रश्न अजूनही आहे. हा प्रश्न मोडीत काढणे स्त्री-पुरुष समानतेसाठी गरजेचे आहे.

भारतीय राज्यघटने मध्ये धर्म, जात, पंथ, भाषा व लिंग या सर्वांना छेद देऊन समान नागरिकत्व सर्वांना बहाल केलेले आहे. कायद्याचे अधिराज्य हे भारतीय लोकशाहीचे अधिष्ठान मानलेले आहे. 'सर्व नागरिक धर्माने अथवा रूढी-परंपरेने नसून समान कायद्याने बांधलेले आहेत', हा  'कायद्याचे अधिराज्य' या संकल्पनेचा आशय आहे. सर्वांना एकच कायदा या संकल्पनेतून समान नागरी कायद्याच्या संकल्पनेचा उदय होतो असे म्हणावयास हरकत नाही.

घटनेतील कलम २५ प्रमाणे धर्म स्वातंत्र्य आहे, परंतु या धर्म स्वातंत्र्याच्या आधाराने काही भूमिका घटनेतील कलम १४ व १५ मधील तरतुदींना बाधा आणत असतील तर कलम १४ व १५ मधील तरतुदी कलम २५ मधील तरतुदींना छेद देऊ शकतील; म्हणजेच कलम १४ व १५ प्रभावी ठरतील, असे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सांगतो.

म्हणूनच समान नागरी कायद्याला धर्माच्या व धार्मिक रूढींच्या आधारे विरोध करता येणार नाही. भारतीय राज्यघटना तयार होत होती त्याच काळात संयुक्त राष्ट्रसंघटनेची मानवी हक्काची सनद तयार होत होती. या मानवी हक्काच्या सनदेमध्ये स्त्री-पुरुष समानता हा एक महत्त्वाचा मानवी हक्क मानलेला आहे.

कायद्याची अंमलबाजवणी

भारताच्या राज्यघटनेनुसार दोन भागात कायद्यांचं वर्गीकरण केलं जातं. नागरी कायदे आणि गुन्हेगारी कायदे. लग्न, संपत्ती, वारसदार यांसारखे कुटुंब किंवा व्यक्तीशी संबंधित प्रकरणं नागरी कायद्या अंतर्गत येतात. घटनेतील कलम ४४ अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. मात्र यावरून कायमच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आतापर्यंत यावर कुठलंही मोठं पाऊल उचललं गेलं नाही.

भारतात कायदा-व्यवस्था साधरणत: राज्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात. तर काही प्रकरणं अशी असतात की ती राज्य आणि. केंद्राच्या अधिकार क्षेत्रात असतात. केंद्राने कुठलाही कायदा बनवला तरी त्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना असतात. किंवा केंद्राने बनवलेल्या कायद्याच्या मसुद्यावर राज्य आपापला कायदा बनवू शकतात.

समान नागरी कायदा राज्यांची जबाबदारी आहे तर राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र आणि राज्य अशा दोघांचीही जबाबदारी आहे.

याचा फक्त मुस्लिम समाजावर परिणाम होईल?

समान नागरी कायद्याबाबत चर्चा होताना कायमच हिंदू आणि मुस्लिम ध्रुवीकरणाबाबत बोललं जातं. मात्र, मुस्लिमांच्या लग्न आणि वारसा हक्कांबाबत वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्याच प्रकारे हिंदूंमध्ये येणाऱ्या समाजांमध्येही वेगवेगळ्या पद्धती आहेत. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाच्या भीतीचीही यानिमित्ताने चर्चा होते.

खरतर भारतात अनेक समाज, अनेक वर्ग, अनेक परंपरा आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्वच समाजांच्या परंपरांमध्ये गोंधळ निर्माण होऊन अडथळे येऊ निर्माण होऊ शकतात. मुस्लीम आणि ख्रिश्चन भारतात भलेही अल्पसंख्यांक आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या काही ठाम परंपरा आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास त्यांचं विशेषत्व धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशीही भीती त्यांना वाटते.

समान नागरी कायदा करणं म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात पाऊल टाकणं असा समज जाणीवपूर्वक पसरवला गेला आहे. सर्व धर्मांचे व्यक्तिगत कायदे रद्दबातल ठरवून देशभर एकच एक कायदा लागू करायचा असेल तर त्याच परिणाम सर्वधर्मीयांवर होईल; केवळ मुस्लिमांवर नव्हे ही वस्तुस्थिती आहे.

समान नागरी कायदा भारतातील नागरिकांचे वैयक्तिक कायदे तयार करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे. जो सर्व नागरिकांना त्यांचा धर्म, लिंग, लिंग आणि लैंगिक प्रवृत्ती विचारात न घेता समान रीतीने लागू होतो.

दक्षिण भारत, ईशान्य भारत किंवा आदिवासी भाग असो, भारतात सर्वत्र लग्न परंपरा वेगवेगळ्या आहे. वारसा हक्काच्या परंपरा सुद्धा भिन्न व वेगवेगळ्या आहेत. समान नागरी कायद्याचा विचार केल्यास त्यात दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. सर्वांत पाहिली गोष्ट म्हणजे सर्व धर्मांसाठी एकच कायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व समाजांमध्येही एकसारखेच कायदे.

समारोप

समान नागरी संहिता असावी हे घटनेनं मार्गदर्शकतत्त्वात सांगून ठेवलंच आहे; मात्र, तो मूलभूत हक्कांचा भाग नसल्यानं अंमलबजावणी बंधनकारक नाही. न्यायालयात त्यावर दाद मागता येत नाही. समान नागरी संहितेचे समर्थक देशाच्या एकात्मतेसाठी समान कायद्याची गरज असल्याचा युक्तिवाद करतात. दुसरा युक्तिवाद असतो तो, महिलांच्या अधिकारांचा.

देशात भारतीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून समान नागरीक कायदा असावा असे म्हणणे योग्य ठरेल. मात्र, सगळ्यांत मोठी अडचण बहुस्तरीय सामाजिक रचना आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात अंतर्विरोध आहे. समान कायद्याला तात्त्विकदृष्ट्या विरोधाचं काहीच कारण नाही. मुद्दा, त्यात तरतुदी काय असणार आणि त्या प्रचंड वैविध्य असलेल्या देशात अमलात कशा आणणार हा असला पाहिजे. त्यावर कायद्याचे समर्थक आणि सरकार काहीच बोलत नाहीत, तोवर उणंदुणं काढणारी चर्चा इतकंच स्वरूप उरतं.

समान नागरी कायदा लागू केल्यास देशातील कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील आणि हे सर्व अत्यंत अडचणीचं,आव्हानात्मक आणि क्लिष्ट असेल. तसेच ही कायदेशीर प्रक्रिया एका झटक्यात होणारी नसून मोठी व किचकट अशी प्रक्रिया असणार आहे.

Read More

Happy Birthday रेल्वे! #indianrailwayday

Apr 17, 2023

लोकल ट्रेन, रेल्वे ही केवळ मुंबईकरांच्या नाही तर संपूर्ण भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कमीत कमी पैशात आणि वेगात आपल्या इच्छित ठिकाणी जाण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे रेल्वे. आज १६ एप्रिल. याच दिवशी १८५३ रोजी भारतात पहिली प्रवासी ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. या प्रवासी ट्रेन मध्ये त्यावेळी ४०० लोकांनी प्रवास केला होता. या ट्रेन ने सव्वा तासात ३४ किलोमीटर अंतर पार केले होते. विशेष म्हणजे त्यादिवशी चक्क सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. चला तर मग याच निमित्ताने जाणून घेऊया भारतीय रेल्वे संदर्भात काही मजेशीर आणि खास गोष्टी.

भारतात जगातील ४थं मोठं रेल्वेचं जाळं आहे. अमेरिका, चीन आणि रशिया नंतर भारताचा नंबर लागतो. भारतीय रेल्वे संबंधात काही interesting गोष्टी.

१. भारतातील सर्वात मोठं नाव असलेलं रेल्वे स्टेशन - वेंकटनारसिम्हाराजुवरिपेटा. हे आंध्र प्रदेशमधल्या चित्तूर जिल्ह्यातील तामिळनाडू सीमेवर आहे. 

२. सर्वात छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन - इब
ओडिशातील झारसुगुडा इथे हे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर केवळ दोनच फलाट आहेत आणि गाड्या ही केवळ २ मिनिटं थांबतात

३. मथुरा हे देशातलं सगळयात मोठं जंक्शन आहे.

४. हावडा हे सगळयात व्यस्त रेल्वे जंक्शन आहे

५. रेल्वे स्टेशन वर स्टेशनचं नाव काळ्या पिवळ्या अक्षरात लिहिलेलं असतं, कारण पिवळा रंग हा प्रकाश परावर्तित करणारा रंग आहे. त्यामुळे लोको पायलटला दूर अंतरावरूनही स्टेशनचं नाव दिसतं. रात्रीच्या वेळीदेखील अंधारातही हा पिवळा रंग स्पष्ट दिसतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिले जाते.

६. रेल्वेस्टेशनवरील बोर्ड वर समुद्र सपाटीपासून उंची लिहिलेली असते कारण याचा फायदा रेल्वेच्या ड्रायव्हरला होतो.
समजा, एखादी रेल्वे 100 मीटर समुद्र सपाटीच्या उंचीवरून 200 मीटर समुद्र सपाटीच्या उंची पर्यंत जात असेल तर ड्रायव्हरला निर्णय घेण्यास सोपे जाते. तो निर्णय घेऊ शकतो की, 100 मीटर अधिक चढासाठी त्याला इंजिनला किती पॉवर द्यावी लागेल.

जर रेल्वे खालच्या दिशेने येत असेल तर ड्रायव्हरला किती ब्रेक लावावा लागेल आणि किती वेग ठेवावा लागेल या सर्व गोष्टींसाठी रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिली जाते.

याशिवाय समुद्र सपाटीपासूनच्या उंचीच्या मदतीने रेल्वेच्या वरती लागलेल्या विजच्या तारांना एकसमान उंची देण्यास मदत होते. जेणेकरून, विजेच्या तारा ट्रेनशी प्रत्येक वेळेस जोडलेल्या असतील.

७. सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनस मधला फरक काय?

जंक्शन (Junction)
जर एखाद्या रेल्वे स्थानकाच्या नावापुढे जंक्शन लिहिले असेल, तर याचा अर्थ या स्थानकावर ट्रेन येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकापेक्षा जास्त मार्ग आहेत. म्हणजे एखादी गाडी एका मार्गावरून येत असेल तर ती दोन मार्गांनीही जाऊ शकते. उदा - कल्याण 

सेंट्रल (Central)
काही रेल्वे स्थानकांच्या नावापुढे सेंट्रलही लिहिलेले असते. म्हणजे त्या शहरात अनेक रेल्वे स्टेशन आहेत आणि ज्या स्टेशनच्या पुढे सेंट्रल लिहिले आहे ते त्या शहरातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे. तसेच, जर एखाद्या रेल्वे स्थानकाच्या नावासमोर सेंट्रल लिहिले असेल, तर त्याचा अर्थ ते स्थानक त्या शहरातील सर्वात व्यस्त स्थानक आहे. 
उदा - मुंबई सेंट्रल

टर्मिनस 
अशीही काही रेल्वे स्थानके आहेत ज्यांच्या नावापुढे टर्मिनस लिहिलेलं असतं. याचा अर्थ ट्रेन ज्या दिशेला येते, त्याच बाजूने परत जाते. म्हणजे त्या स्थानकासमोर रेल्वे ट्रॅक नसल्याने गाडी पुढे जाऊ शकत नाही.
उदा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट टर्मिनस 

८. भारतातील रेल्वे स्टेशन्सची काही मजेशीर नावं
* साली - जोधपूर (राजस्थान)
* दिवाना - पानिपत (हरियाणा)
* दारू स्टेशन - हजारीबाग (हरियाणा)
* बिल्ली जंक्शन - सोनभद्र (उत्तर प्रदेश)
* बाप - जोधपूर (राजस्थान)
* काला बकरा - जालंधर (पंजाब)
* सुअर - रामपूर (उत्तर प्रदेश)
* कुत्ता - कूर्ग (कर्नाटक)
* ओढनिया चाचा  - जोधपूर (राजस्थान)

९. सिंहाबाद हे भारतातील सर्वात शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजांच्या काळात हे स्टेशन जसं होतं आजही ते त्याच रुपात आहे. सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील मलादा जिल्ह्यातील हबीबपूरमध्ये आहे. तर हे रेल्वे स्टेशन बांगलादेशच्या सीमला लागून आहे. या रेल्वे स्टेशनवर मालगाड्या ठेवल्या जात होत्या. त्यामुळे या स्टेशनवर लोकांची रहदारी कमी आहे. बांगलादेश या स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. सिंहाबाद या रेल्वे स्टेशनने आपली इंग्रजांच्या काळातील ओळख आजही तशीच जपली आहे. इंग्रजांच्या काळात असलेले सिग्नलसुद्धा तसेच आहेत. मजेशीर म्हणजे कार्डबोर्डवाले तिकीटही आजही या स्टेशनवर मिळतात. गंमत म्हणजे इंग्रजांच्या काळातील टेलिफोन पण इथे पाहिला मिळतो.

१० दिब्रुगढ आणि कन्याकुमारी दरम्यान धावणारी विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ते सुमारे 82 तासात 4,000 किमी पर्यंतचे अंतर कापते. 
तर मेट्टुपालयम-उटी निलगिरी प्रवासी ट्रेन ही भारतातली कमी वेगाने धावणारी ट्रेन आहे. ताशी १० किलोमीटर इतका तिचा वेग आहे.

११. नवापूर हे एक असं स्टेशन आहे, जे अर्ध महाराष्ट्रातल्या नंदुरबार मध्ये आहे, आणि उर्वरित अर्ध स्टेशन हे गुजरातमधील तापी जिल्ह्यातील उच्छल मध्ये आहे.

Read More

एका गझलकाराचा जन्म दिवस

Apr 14, 2023

एखादा कवी जेव्हा जन्माला येतो, म्हणजे नक्की काय होतं?  त्याच्या जन्माच्या वेळी आईला नेमक्या काय यातना होत असतील? त्याही पेक्षा नेमके काय डोहाळे लागले असतील तिला? पहाटेच्या किरमिजी प्रकाशात प्राजक्ताच्या खाली उभं राहून, सडा अलगद पदरात झेलावा असं वाटत असेल का तिला? घरात रांधत असताना खिडकीबाहेर कोकीळेचे कूजन ऐकून, तिलाही बेंबीच्या देठापासून - ‘कुहूsss‘ करावसं वाटलं असेल का? किंवा ग्रीष्मातल्या पानगळतीत सरपण गोळा करत असताना तिची नजर कुठेतरी मोरपीस शोधत असेल का? - माहिती नाही!

जेव्हा कवी पाळण्याच्या हिंदोळ्यात हातपाय झाडत छत बघत असेल, तेव्हा त्या चंचलतेत त्याचे डोळे अधिक बाणेदार दिसत असतील का?  किंवा माय जेव्हा स्वतः घामाने डबडबून ऐन दुपारी त्याला पदराने वारा घालत असेल, तेव्हा घामाचा ओघळ त्याच्या गालावर पडून त्याची झोप उडत असेल का/त्याचं अंग पोळत असेल का?  माहिती नाही...

ह्या सगळ्या गोष्टी फारच अतिशयोक्तिकच्या आहेत, हे पटतंय. पण प्रश्न तोच राहतो, की - एका कवीचा जन्म होतो म्हणजे नक्की काय होतं? खरंतर ह्याचं उत्तर कवीलाही माहिती नसतं. तो त्याच्या अस्तित्वाबद्दल फक्त ठोकताळे बांधतो. उदा. तो कधी पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले चितेवरी लोक जे नको ते रडून गेले असं म्हणून एक प्रकारे शोक व्यक्त करतो, तर कधी

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.

असे म्हणून एक प्रेरणेचा झळाळ स्वतःत बघतो.

सुज्ञांना लक्षात आले असेलच की ह्या वरच्या ओळी  सुरेश भटांच्या आहेत. ‘सुरेश भट’ हे नाव ऐकताच अनेक गझलांच्या ओळी कानात घुमतात. आणि त्यातल्या प्रत्येक ओळी त्यांचं असं स्वतःच अस्तित्व घेऊन आलेल्या असतात. एकासारखी दुसरी ओळ सापडणं शक्यच नाही. कधी ते

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!

अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

असे म्हणून अत्यंत उच्च दर्जाची अशी विरह भावना दाखवतात, तर कधी

अजून थांब, लागली जगास झोप आंधळी..  

दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी..

तुला-मला विचारुनी फुटेल आज तांबडे..!!

असे म्हणून आर्द्र प्रणय भावना असलेलले गीत लिहितात. ही माणसंच अशी ग्रेट आहेत, कि एकावेळी अनेक व्यक्तींचं जगणं ते जगत असतात. एक तुमचं आमचं जीवन त्यांच्या शाईतून झरत असत. अत्यंत संवेदनशील आणि विद्रोही स्वभाव आणि व्याकरणावर पूर्ण हुकूमत असलेल्या सुरेश भटांनी गझलेत अफाट विविधता आणली. हिंदी -उर्दूच्या तोडीस तोड वजन त्यांनी मराठी गझलेला प्राप्त करून दिले. त्यांनी पेटवलेली मराठी गझलेची ज्योत आजही अनेक जणांना गझलेचा मार्ग दाखवते आहे.

जरी ह्या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही…!!

असे आजच्या भाषेत #attitude मध्ये बोलणाऱ्या सुरेश भटांचा आज ९१ वा जन्म दिवस. गेले कित्येक दिवस त्यांची गझल पुढल्या पिढीशी संवाद साधतेच आहे. कविमनाने जन्माला आलेल्या अर्भकांना एक वाट उजेडात आणून देतीये, ज्यात बरेच काटे - खाच खळगे आहेत.

त्यामुळे कवी जन्माला येतो म्हणजे नक्की काय होतं हे आपल्याला कळेल तेव्हा कळों, पण तो पर्यंत अशा महान क्षणी जन्मलेल्या हातांचे तळवे आपल्या डोळ्यांना लावून जळजळ शांत करणं एवढंच आपल्या हाती आहे.

Read More

कविता अन् बरंच काही...

Mar 27, 2023

जागतिक कवितादिन विशेष
काव्यशास्त्रविनोदेन कालौ गच्छति धीमताम्| अर्थात विद्वजन त्यांचा वेळ हा काव्य, शास्त्र आणि हास्यविनोदात व्यतित करतात. जन्माच्या आधीपासून माणसाची नाळ ही कवितेशी जोडलेली असते. माणसाला कवितेची पहिली ओळख ही आईच्या गर्भातच होते... कारण आईच्या ह्रदयाचे लयबद्ध ठोके, हे त्या बाळासाठी आश्वासक काव्यच असतं, आणि जेव्हा ते बाळ जन्माला येतं, शब्दांशी त्याची गाठभेट होते, तेव्हा त्या लयबद्ध काव्याला मूर्तरुप प्राप्त होतं.
कवितेची साधीसोपी व्याख्या म्हणजे, वाक्यम् रसात्मकम् काव्यम्| अर्थात् रसपूर्ण वाक्याला काव्य म्हणतात. साहित्यातले नवरस इतर कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा कवितेतून जास्त प्रभावीपणे मांडता येतात. म्हणूनच व्यास-वाल्मिकींसारख्या ऋषीमुनींनी आपली प्रतिभा काव्यरुपानेच प्रकट केली. रामायण-महाभारतासारखी आर्षमहाकाव्य त्यातूनच निर्माण झाली.
सर्वसामान्यांच्या मनाची पकड घेण्याची अफाट ताकद कवितेत आहे. म्हणूनच संतांनी आपली शिकवण मांडण्यासाठी काव्याचा आधार घेतला. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, एकनाथांची भारूडं, तुकोबांचे अभंग किंवा समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या सगळ्या संतांनी विविध काव्यरुपांच्या माध्यमातून त्या त्या काळात प्रबोधन केलं.
कविता माणसाच्या अत्यंत जवळची असते, कारण शब्दांचा अर्थ कळत नसला तरी चाल आणि ताल त्याला कळतात. ‘नीज नीज बाळा रे’ च्या तालावर तो झोपतो, ‘अडगुळं मडगुळं’ च्या तालावर तीट लावून तयार होतो, ‘सोनू उभा राहिला, आम्ही नाही पाहिला’ ऐकत तो उभं रहायला शिकतो, ‘एक पाय नाचव रे गोविंदा’ च्या तालावर चिमुकले पाय आपटून नाचतो. ‘ये रे ये रे पावसा म्हणत’ पावसात चिंब भिजलेला असतो.
कवितेची कितीतरी रुपं आणि किती अंग आहेत, तिचं प्रत्येक रुप सालंकृत आहे, मनमोहक आहे. अभंग, भक्तीगीतं, भावगीतं, लोकगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कुटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गौळण, लावणी, ओव्या, पोवाडे, आर्या, गझल, हायकू, रुबाई, शायरी, वात्रटिका, चावटिका, क्षणिका, गोंधळ, भारूड, सवाल-जवाब, श्लोक, सुनीता, पटके, दोहे या सगळ्या प्रांतात कविता मुशाफिरी करते.
पूर्वीच्या काळी लग्न होऊन सासरी गेलेल्या बायकांसाठी जात्यावरच्या ओव्या, मंगळागौरीची गाणी ही व्यक्त होण्याची साधनं होती. बहिणाबाईंच्या भाषेत सांगायचं झालं तर, अरे घरोटा घरोटा, तयातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं पोटातून येतं ओठी. अर्थात् जितक्या सहजतेने जात्यातून पीठ बाहेर येतं, तितक्या सहजतेने माझ्या ओठी गाणं येतं, जन्म घेतं.
तमाशा ही महाराष्ट्राची ओळख, तमाशा ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, भिनलेली लोककला. नृत्याची लय, ढोलकीचा ठेका, नर्तकीचं लावंण्य यासोबतच लावणीत रंगत आणतात ते शाहीरांची कवनं आणि सवाल जबाब. हे सवाल जबाब रचत असताना जेवढी संदर्भसंपृक्तता महत्वाची, तेवढीच महत्त्वाची असते काव्याची जाण, प्रतिभा. उदाहरण बघा, एकाने सवाल केला, ‘बीज ही असते जरी नराचे, रुजते नारीच्या उदरी... जन्म देऊनी जीवास नारी, घेते आईपण पदरी. नियम असे हा निसर्गाचा घडले पण रे अकल्पित, कोण जाहला पुरुषची ऐसा, आई म्हणूनी जगतात.’ तर याला उत्तर देणारा म्हणतो,  ‘सवाल ऐसा बरवा केला, धन्यवाद घे तुज म्हणुनी, युगपुरुषाचे नाव ऐकता, ऊर ही येई हा भरुनी. ज्ञानेशाच्या ओठी ओवी या भूमीवर अवतरली, ब्रह्मचारी हा योगी नर, होई ज्ञानेश्वर माऊली...
काव्य हे मुळात एक शास्त्र आहे. शास्त्र हे नियमात बांधलेलं असतं. तशीच कवितासुद्धा छंद, वृत्त, अलंकार, यात गुंफलेली असावी अशी अपेक्षा असते. असच छंद, वृत्त, अलंकार यांनी परिपूर्ण काव्य मराठी साहित्याला लाभलं ते पंतकाव्याच्या रूपाने. अनेक अलंकारांपैकी 'अन्योक्ती' अलंकार समर्थपणे पेलला तो कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी. आता त्यांचीच कोकिलान्योक्ती पहा 'येथे समस्त बहिरे वसताती लोक, का मधुर भाषणे तू करिसी अनेक? हे मूर्ख! यांना किमपीही नसे विवेक, वर्णावरून तुजला गणतील काक'
कवी आणि त्यांच्या कवितांच्या शैलीबद्दल लिहिताना कुसुमाग्रज म्हणतात 'धरेस सांगाल का कधी? वाहत जा तू जलापरी, धगधगत्या विजेस म्हणाल का? येऊन बैस तू दवापरी?' प्रत्येक कवीची व्यक्त होण्याची पद्धत निराळी असते. कवीच्या स्वभावानुसार कवितेचा स्वभाव ठरतो आणि म्हणूनच कवितेचे हे शब्द त्या कवीच्या अंतर्मनाची एक झलक आपल्याला दाखवून जातात.
कविता हा भाषेचा सर्वप्रथम आविष्कार आहे. इतर साहित्यप्रकारांपेक्षा तिचा रूपबंध वेगळा आहे. कारण कथा, कादंबरी, म्हंटल की तिथे कथनात्मकता आवश्यक असते, नाटक म्हंटल की तिथे नाट्यमयता येते. पण कवितेत सगळ्यात आधी आणि सर्वाधिक महत्वाचा असतो तो भाव. जागतिक दर्जाच्या कवी वर्ड्सवर्थ म्हणतो की 'A spontaneous overflow of powerful feelings means poetry' म्हणजेच उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आणि सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता.

छंद, अलंकार, गेयता, उत्स्फूर्तता, आर्तता, उत्कटता ही कवितेची महत्वाची अंग आहेत. तशीच शब्दांची आणि भावनांची सुयोग्य सांगड घालत रचना करणं हा कवितेचा गाभा आहे. शब्द आणि भावनांची सुयोग्य रचना मला ठायी ठायी जिथे प्रत्ययाला आली ते म्हणजे ग. दि. माडगूळकरांच्या गीतरामायणात. वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरही अपत्यप्राप्ती न झालेल्या दशरथाबद्दल लिहिताना गदिमा म्हणतात 'कल्पतरूला फुल नसे का? वसंत सरला तरी'...
जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात प्रभावीपणे मांडणं हे कवितेचं बलस्थान विं.दा. करंदीकरांच्या 'घेता' या कवितेत आपल्याला कवितेच्या या बलस्थानाची प्रचिती येते. सावरकरांनी मातृभूमीच्या विरहामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली व्याकुळता एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडली असती तर कदाचित ती हृदयाला इतकी भिडली नसती जितकी ती त्यांच्या 'सागरास' या कवितेतून मनाला भिडते.
वंगभंगाच्या चळवळीत 'वंदे मातरम' या काव्याचा प्रभाव एवढा जास्त होता की संपूर्ण भारतीय जनतेसाठी ते काव्य वेदमंत्रांइतकं वंदनीय ठरू लागलं होतं. संयुक्त महाराष्टाच्या चळवळीत आचार्य अत्रे, ना.ग. गोरे, यांसारख्या दिग्गजांच्या भाषणांने, वक्तृत्वाने, महाराष्ट्र जितका ढवळून निघाला होता, तितकाच तो शाहीर अमरशेखांच्या पोवाड्यांनीही ढवळून निघाला होता. मोर्चाच्या अग्रभागी उभं राहून 'जाग मराठा जाग, जमाना बदलेगा' असं खड्या आवाजात म्हणणाऱ्या अमरशेखांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला दुतर्फा गर्दी करत असत. ही असते कवितेची ताकद.
प्रेम, निसर्ग, करुणा या भावात्मिक अवस्थतेतून कवितेला बाहेर काढत 'एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने' असं म्हणत केशवसुतांनी आधुनिक कवितेची तुतारी फुंकली. तर याच मराठी कवितेला वास्तवाचं भान दिलं ते दलित कवींनी... अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, वामनदादा कर्डक यांनी वंचितांच्या जीण्यातली दाहकता कवितेच्या माध्यमातून जगासमोर आणली. 'शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली... भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली...' आकाशातील चंद्राच्या शीतल सौंदर्यापेक्षा पोटातली आग शांत करणारा भाकरीचा चंद्र कष्टकरी जनतेसाठी किती महत्वाचा आहे हे नारायण सुर्वेंच्या कवितेने दाखवून दिले.

कवितेचं गाव नाही, तर कवितेचं अवघं विश्व आहे... जे अफाट आणि सुंदर आहे. पण आज कुठेतरी आमची पिढी कवितेपासून काहीशी दूर जाताना दिसतेय. आधुनिकतेमुळे रोजच जीवन गतिमान झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे ४००० ओव्यांचं दीर्घकाव्य, त्यानंतर ४०० ओळींचं खंडकाव्य, ४ कडव्यांचं गीत, १४ ओळींचं सुनीत ते आता अवघी चारोळी असा कवितेचा प्रवाह आक्रसत गेलाय. अभ्यासक्रमातल्या कवितासुद्धा गुण मिळवण्यापुरत्या मर्यादित राहिल्यात.. प्रश्नपत्रिकांच्या सबजेक्टिव्ह ते ऑब्जेक्टिव्ह या प्रवासात पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधल्या 'कवितेचे रसग्रहण करा' या प्रश्नाऐवजी 'काव्यपंक्ती पूर्ण करा' हा प्रश्न येऊ लागला आणि त्यामुळे कवितेच्या अर्थापेक्षा तिच्या पाठांतराला महत्व प्राप्त झालं. मग मुलांना त्या कवितेची गोडी कशी लागायची? त्यांना त्या कवितेबद्दल आत्मीयता कशी वाटायची?
पण असं जरी असलं तरी एक गोष्ट मात्र खरी, आपण सगळेच कायम कवितेच्या गावात जगत असतो. माणसाला कविता पावलो पावली भेटत असते, गवसत असते. आनंदात असलो की आपण गाणं गुणगुणतो, दुःखात आपल्याला आर्त गाणी आठवतात, प्रेमात पडलेल्या माणसाचं तर अवघ विश्वच काव्यमय झालेलं असत. कवितेचं एक अक्ख गाव आपल्या आत वसलेलं असतं... दडलेलं असतं.... गरज असते ती ते गाव शोधण्याची, त्या गावात रमण्याची.. एकदा का या कवितेच्या गावात आपण रमलो की मग आपसूकच हृदयातून गाणं स्फुरतं... म्हणूनच म्हंटल जात ... 'कवितेच्या गावा जावे, हृदयाचे गाणे गावे'

-    बंबईवाली

Read More

राजामौली दिग्दर्शित RRR या सिनेमातील ‘Natu Natu’ गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Mar 24, 2023

आपल्याकडे लोकांना नाक हा अवयव गंध घेण्यासाठी नाही, तर मुरडण्यासाठीच आहे असं वाटतं की काय? असा प्रश्न पडलाय. थेट मुद्यावरच येऊ… १३ मार्च २०२३ हा दिवस भारतीय सिनेविश्वासाठी सुवर्ण दिवस होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस. कारण ‘The Elephant Whisperers’ या डॉक्यूमेंट्रीला आणि एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या सिनेमातील ‘Natu Natu’ गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘जय हो’ नंतर असलेली कित्येक वर्षांची प्रतीक्षा नाटू नाटू ने संपवली. वास्तविक जेव्हा आर.आर.आर. सिनेमाचा ऑस्कर नामांकनाच्या यादीत समावेश झाला, तेव्हाच अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. कारण तो सिनेमा मुळातच तेवढ्या ताकदीने बनवण्यात आला होता. त्यातल्या नाटू नाटू गाण्याने थिएटरपासून इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला होता. प्रचंड एनर्जी, अफाट कोरिओग्राफी, साधे पण लक्ष वेधून घेणारे शब्द आणि डोक्यात रेंगाळणारी चाल या सगळ्याच आघाड्यांवर हे गाणं यशस्वी झालं, आणि ऑस्कर अॅवॉर्डने त्यावर शिक्कामोर्तब केलं. अर्थात् गेल्या काही दिवसातला दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा प्रवास, त्यांनी दिलेले दर्जेदार सिनेमे पाहिल्यावर पुढचा ऑस्कर एखादा दाक्षिणात्य सिनेमाचं भारतात घेऊन येईल याची मनोमन खूण पटली होती. 


ऑस्करची अनाउंन्समेंट झाली, आणि इथे सोशल मिडीयावर पोस्ट्सचा पूर आला. अनेकांनी अभिनंदन केलं, आनंद व्यक्त केला, आणि काहीजणांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून टिका केली. टीकाकारांच्या पोस्ट आणि त्यातले विचार वाचून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली. एका ताईंनी पोस्ट केली होती, वाट्टेल तसे हातपाय झाडून नाचू नाचू करण्याला ऑस्कर मिळत असेल, तर आमच्या गल्लीतल्या तळीरामालाही मिळायला हवा. बरं या ताई निवृत्त प्राध्यापिका, फिल्म मेकर, ज्युरी मेंबर फॉर फिल्म्स अँड थिएटर. त्यांची ती पोस्ट बघून फार वाईट वाटलं. सिनेअभ्यासक असूनही इतक्या ताकदीचं गाणं बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील याची जाणीवही त्यांना असू नये? वाट्टेल तसे हातपायचं झाडायचे आहेत ना, मग ते फेसबूकवर झाडण्यापेक्षा, त्यातली एखादी स्टेप करून दाखवा, अशी कमेंट करण्याचा मोह मी आवरता घेतला. 


मदर इंडियाला ऑस्कर नाकारताना लॉट ऑफ मड अँड ब्लड असं म्हटलं गेलं, म्हणून आमचं रक्त उसळलं होतं. लगान सिनेमाला ऑस्कर मिळाला नाही, तेव्हा गोऱ्यांचा पराभव जिव्हारी लागला असेल म्हणून दिला नाही अशा बोंबाही आम्ही मारल्या. स्लमडॉग मिलेनियर हा सिनेमा पूर्णतः भारतीय सिनेमा नव्हता, त्यामुळे त्यातही आम्हाला परिपूर्ण आनंद झाला नाही आणि त्यावर पाश्चिमात्यांना अपेक्षित गरीब भारत दाखवला म्हणून पुरस्कार मिळाला अशीही कुजबूज झाली. अखेरीस तो परिपूर्ण आनंद आपल्याला नाटू नाटू गाण्याने मिळवून दिला. ऑस्करच्या ‘बेस्ट ओरिजनल साँग’ या कॅटेगरीत नाटू नाटू ने आपला ठसा उमटवला, आणि अनेक भारतीयांना पोटशूळ उठला. अनेकांनी तर ‘फालतू गाणं’ असा शिक्का त्यावर मारला. हास्यास्पद म्हणजे भारतात आपले प्रॉडक्टस् विकायची स्ट्रॅटेजी सुरु झाली अशीही आरोळी अनेकांनी सुरु केली. असं अरण्यरुदन करणाऱ्यांना पु.लं. च्या भाषेत उत्तर द्यावंसं वाटतं, ‘आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय? एकूण कर्तृत्व काय? याचा विचार न करता मत मांडायचं, म्हणजे आपण महानगरपालिकेच्या उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असलो, तरीही अमेरिकेचे आर्थिक धोरण यावर मत ठोकून द्यायचं.’ या असल्या कॅटेगरीत या माणसांची गणना होते. 


‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिलंय, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत गीतकार चंद्रा बोस यांनी, १९ महिने ते या गाण्यावर काम करत होते. एस.एस. राजामौली यांना असं एक गाणं सिनेमात हवंच होतं, जे प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावेल आणि थिरकायला भाग पाडेल. रामचरण आणि ज्युनिअर एन.टी.आर. हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले उत्तम डान्सर्स, त्यामुळे त्यांच्या या कलेचा आविष्कार दाखवता येईल असं गाणं तू मला दे अशी राजामौली यांनी एम.एम. कीरवाणी यांना गळ घातली, आणि त्यानुसार गाणं लिहिण्यासाठी किरवाणी यांनी चंद्र बोस यांना आग्रह केला. या सिनेमात भीम अर्थात् ज्युनिएर एन.टी.आर हा तेलंगणाचा आहे आणि राम म्हणजेच रामचरण हा आंध्रप्रदेशचा. सिनेमातलं गाणं कालसुसंगत वाटावं म्हणून चंद्रा बोस यांनी १९२० साली तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बोली भाषेत जे शब्द वापरले जायचे त्या शब्दांचा अंतर्भाव या गाण्यात केलेला आहे.


हे गाणं मातीतलं आहे, प्रत्येक शब्दात रांगडेपणा आहे. या गाण्यातले शब्द तेलुगु आहेत. नाटू या शब्दाचा सरळ सोपा अर्थ म्हणजे ‘नाचा’ पण नाचा असं सांगताना कसं नाचा हे सुद्धा वेगवेगळ्या उपमा देऊन या गाण्यात सांगितलं आहे. कसं नाचा तर उधळलेल्या उन्मत्त बैलासारखं, नाचा कसं, तर हिरव्या मिरचीच्या ठेच्याच्या चटक्यासारखं, नाचा कसं तर खोलवर रुतणाऱ्या कट्यारीच्या धारेसारखं, अंगावर आसूड ओढून नाचणाऱ्या पोतराजासारखं, वडाच्या झाडाखाली जमलेल्या पोरांसारखं नाचा. ही सगळी उदाहरणं, उपमा अस्सल भारताच्या मातीतल्या आणि सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारातल्या आहेत. या गाण्यात जेवढा वाटा संगीत आणि नृत्याचा आहे, तेवढाच तो या शब्दांचा देखिल आहे. 


प्रेम रक्षिथ यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या संपूर्ण गाण्यासाठी त्यांनी एकूण ९५ स्टेप्स डिझाईन केल्या आणि जी सिग्नेचर स्टेप होती, जिने इन्स्टाग्रामवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्या स्टेपसाठी एकूण ३० वेगवेगळ्या स्टेप डिझाईन केलेल्या होत्या. या गाण्याचं संपूर्ण शूटींग युक्रेनची राजधानी किव्ह मध्ये झालंय. त्या दिवसात किव्हमध्ये प्रचंड उन्हाळा होता, सकाळी ६ वाजता सूर्योदय होऊन रात्री ८ वाजता सूर्यास्त व्हायचा आणि अशा तळपत्या उन्हात या गाण्याचे एकूण १८ टेक झाले, विथ सेम एनर्जी आणि पेस. प्रत्येक बीटसोबत स्टेप मॅच होण्यासाठी राजामौली प्रचंड आग्रही असायचे. जोवर मनासारखं होत नाही तोवर थांबायचं नाही असा चंग प्रत्येकाने बांधला होता, जीव ओतून मेहनत घेतली होती, आणि त्यानंतर काय झालं याचे आपण प्रत्येकजण साक्षीदार आहोत. 
एक सिनेमा बनवण्यासाठी हजारो हात कष्ट घेत असतात, गाणं हा भारतीय सिनेसृष्टीचा अविभाज्य भाग आहे. गाण्यांच्या जोरावर सिनेमा हिट झाल्याची कितीतरी उदाहरणं भारतीय सिनेमाने पाहिलेली आहेत. असं म्हणतात एक गाणं अनेक पिढ्यांना जोडून ठेवतं, एक गाणं पुढची कित्येक वर्ष तुम्हाला संस्कृतीशी बांधून ठेवतं, भारतीय समाजजीवनातील गाण्यांचं हे महत्त्व पाहिलं की आर.आर.आर. सिनेमात एस.एस.राजमौली, एम.एम.किरवाणी, चंद्र बोस, प्रेम रक्षिथ, रामचरण, ज्युनिअर एन.टी.आर. यांनी नाटू नाटू गाण्यासाठी इतकी मेहनत का घेतली ते कळतं. आज या सगळ्यांनी आपली मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांना एवढचं सांगावसं वाटतं ‘दोस्तों मेहनत रंग लायी.’ 


बाकी मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन आणि टीकाकारांना प्रेमाचा सल्ला ‘डोळे तपासून घ्या, सारखं काहीतरी डोळ्यात खुपणं बरं नाही’
- बंबईवाली 
#natunatu #rrr #oscar #originalsong #academyawards #oscarawards #nachonacho #aarpaar #aarpaarblog #bambaiwali

Read More

नाटकापलीकडच्या चारचौघी | Charchaughi | Part 1

Mar 27, 2023

चारचौघी... तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं नाटक... आता तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा या नाटकाने रंगभूमीवर दमदार एन्ट्री घेतली आहे... या नाटकाचा आशय जितका परखड तितक्याच दर्जेदार त्यातील या चौघी नायिका... रोहिणीताई हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे अशा वेगवेगळ्या पिढीचे प्रतिनिधत्त्व करणाऱ्या या चारचौघींपेक्षा वेगळ्या असणाऱ्या चौघींचे आरपार विचार आम्ही ऐकले आणि आता ते तुमच्यासमोर दोन भागात सादर करत आहोत... यासोबतच नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी यांचेही या नाटकामागचे विचार आपण जाणून घेतले आहेत...

१. तुम्ही इतकी वर्ष काम करताय, वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करताय, या नाटकाच्या निमित्ताने तुमच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या पर्ण, मुक्ता, कादंबरी यांच्यासोबत स्टेज शेअर करताय... या सहकलाकारांबद्दल काय सांगाल? त्यांच्याकडून कोणती गोष्ट शिकावी असं वाटतं?

रोहिणीताई - यापूर्वी तिघींबरोबर काम करण्याची संधी नव्हती आली, पण या तिघींची कामं चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये मी बघत होते. पण एकत्र काम करण्याचा योग या चारचौघी नाटकामुळे आला. आम्ही तिघी पहिल्यांदा काम करतोय असं अजिबात वाटत नव्हतं, कारण खूप पटकन आम्ही सगळ्याजणी मिसळून गेलो... त्यामुळे तालमीही रंगल्या. मुक्ताकडून खूप शिकण्यासारखं आहे. मला खूप रिहर्सल्स कराव्या लागतात, तरंच माझं पाठांतर होतं. घरी बसून माझं कधीच पाठ होत नाही. पण मुक्ताचं जे पाठांतर आहे, ते आम्ही सगळ्यांनीच तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. या नाटकात तिचा २० मिनिटांचा फोन कट आहे, तो ती ज्या पद्धतीने सादर करते, त्याने आम्ही भारावून जातो. रिहर्सलमध्ये हा फोनकट आम्ही ऐकलाच नव्हता, कारण मुक्ताच्या एकटीचा फोनकट असल्याने तो घरी जाऊन पाठ करेल, आपण पुढची तालीम करू असं होत असल्याने, प्रत्येकवेळी आम्ही तो स्कीप करायचो. संपूर्ण नाटक बसल्यानंतर आम्ही तिचा तो सीन बघितला आणि तिने तो अस्खलितपणे सादर केला. तर तिची ही पाठांतराची उत्तम सवय तिच्याकडून अगदी घेण्यासारखी आहे. पर्ण आमची ‘बबली गर्ल’ होती. आमच्या सगळ्यात ती सर्वात जास्त उत्साही मुलगी होती, आणि ती कधीही प्रॅक्टीस करायला तयार असायची. आम्ही दोघींनी आमचे काही सीन्सची रिहर्सल तर फोनवर केलेली आहे. मी दुसऱ्या शूटिंगला जायचे, तेव्हा आम्ही कित्येकदा फोनवर रिहर्सला केलेल्या आहेत. अशाप्रकारे या मुलींकडून शिकण्यासारखं बरंच आहे, जे मी हळू हळू शिकतेय.

२. मुक्ता तुझी या नाटकातील भूमिका ही एका स्ट्राँग महिलेची आहे... सध्याच्या जगात वर्किंग कपल आपल्याला खूप दिसतात, मात्र घरी आल्यावर ती बाईच वर्किंग असते, पुरूष घरचं काम करेलच असं नाही... तर या परिस्थितीबद्दल तू काय सांगशील?

मुक्ता – हे नाटक लिहिलं गेलं तो काळ बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. पण आताच्या जनरेशनमधल्या जोडप्यांची परिस्थिती बरीच सुधारली आहे. आताच्या काळात घरी आल्यावर बाईच काम करते, अशी सिच्युएशन बघायला मिळत नाही, बरीचशी कामं वाटून घेतली जातात. एकमेकांची गरज ओळखून घरातली कामं केली जातात. पण मागच्या जनरेशनमध्ये हे ठरलेलं असायचं की कितीही दमून बाई घरी आली, तरी खिचडी टाकायला बाईच उठणार. थोडीशी खिचडी चालेल असं म्हणत घरातील पुरूष आपला मोठेपणा दाखवतो. पण आता जसा काळ बदलतोय तशा गोष्टी बदलत जातायत. पण परिस्थिती आली की बाईनेच आधी कामाला उठायचं हा अलिखित नियम पूर्वी होता, म्हणजे कोणी आलं तर चहा टाकायला पटकन बाईच उठणार. पण या गोष्टी हळू हळू बदलत आहेत. मला असं वाटतं की बाईची कपॅसिटी जास्त असते, म्हणून बायका जबाबदाऱ्या घेऊ शकतात. बाई मल्टिटास्किंग असते... माझ्याकडे एक खूप छान उदाहरण आहे या बाबतीत... मी ‘आम्ही दोघी’ नावाची फिल्म केली होती. त्याची दिग्दर्शिका आणि लेखिका दोघीही महिला होत्या.  आतापर्यंत काम केलेला पहिला असा सेट मी बघितला जिथे वेळेत लंच ब्रेक व्हायचा आणि वेळेत पॅकअप व्हायचं, आणि सेटवरचा प्रत्येक मेंबर जेवलाय का हे विचारलं जायचं. काही काही जण म्हणतात की, तो खूप पॅशनेट दिग्दर्शक आहे, त्याला जेवायचं पण भान राहात नाही... पण मी म्हणते हा वेडेपणा आहे. जेव्हा तुम्ही जेवत नाही तेव्हा तुमचा लाईटमनही जेवलेला नसतो, त्याचा त्याचा कामावर परिणाम होतो... त्यामुळे या बारीकसारीक गोष्टी बायका खूप उत्तमपणे सांभाळू शकतात, तेवढी त्यांची कपॅसिटी असते. याच नाटकाच्या सेटवर आम्ही रोहिणीताईंच्या रूपात हे बघतोय की, या वयातह त्या अत्यंत उत्साही असतात. आम्हीच त्यांना म्हणायचो की, ताई जरा पडता का, पण त्या कधीच थकलेल्या मी बघितल्या नाहीत. सत्तरीतही तीन तासाचे दोन प्रयोग बॅक टू बॅक करणं हे सोपं नाहीय. त्यांची डायलॉग डिलिव्हरी ऐकायला खास प्रेक्षक येतात. अभिनेत्री म्हणून त्या उत्तम आहेतच, पण माणूस म्हणूनही आम्ही त्यांना अगदी जवळ बघतो... मला मोठेपणी रोहिणीताईंसारखं वाटतंय. त्यांच्या कपॅसिटीला तोड नाही. त्यामुळे मी म्हणने की बायकांवर जबाबदारी येऊन पडत नाही, तर ती जबाबदारी त्याच घेऊ शकतात.

३. एका वृत्तपत्रात असं आलं होतं की सध्याची चाळीशी म्हणजे सत्तरी आहे... सध्याच्या पिढीत तिशीतच महिलांना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत... पण स्त्रिया मल्टिटास्किंग असतात, तर तू याबद्दल काय सांगशील?

कादंबरी – मला वाटतं आताची चाळीशी म्हणजे अगदी विशी-पंचविशी आहे. तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कसे वागता. तुम्ही स्वतःला आव्हानं देणं बंद केलं तर आयुष्य कायम उदासच वाटेल. त्यामुळे तुमचा दृष्टीकोन कसा आहे, त्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. माझा चाळीसावा वाढदिवस आणि माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस हा एकाद वर्षात आला... पण मला यात काहीच वावगं वाटत नाही. Age is just a number. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याची वैयक्तिक लढाई चालूच असते. त्यामुळे पूर्वी ज्यापद्धतीने एकमेकांना नावं ठेवली जायची त्याचं प्रमाण आता कमी झालंय. मल्टिटास्किंगबाबत सांगायला गेलं तर बायका सक्षम असतात त्यामुळेच विविध कामं करू शकतात. पण मी माझ्या मुलाच्या बाबतीत जरा वेगळा विचार करायला करते. मी त्याला भातुकलीचा सेट आणलाय, मी त्याला खेळायला बाहुली देते. त्यामुळे काही कामं बाईची, काही कामं पुरूषांची असं त्याला लहानपणापसूनच वाटू नये. सगळी कामं समान आहेत, आणि दोघांनी मिळून ती करायची असतात असेच संस्कार त्याच्यावर लहानपणापासून व्हायला हवेत.

४. नाटकांना पुनरूज्जिवीत करणारा ब्रँड म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर... सर नाटक ३१ वर्षांनी पुन्हा एकदा रंगमंचावर सादर होतंय, काय सांगाल याबद्दल?
चंद्रकांत कुलकर्णी – चारचौघी हे नाटक काळाच्या पुढचं आहे हे ३१ वर्षांपूर्वी बोललं गेलं होतं. एक आशयसंपन्न नाटक दशकाच्या सुरवातील येणं आणि ते प्रचंड लोकप्रिय होणं हे पुढील आशयसंपन्न नाटकांसाठीची नांदी होती. बदलणाऱ्या स्त्रीचं चित्र या नाटकात दाखवलं होतं, त्यामुळे स्त्री चळवळीला, प्रेक्षकांना, अभ्यासकांना जवळचं वाटलं होतं. काळाच्या पुढचं कथानक या नाटकात मांडलं होतं त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस ठरलं. मला खूप जणांकडून मागणी येत होती की चारचौघी पुन्हा करा... मी दोन गोष्टींचा विचार करत होतो की त्या तोडीचे कलाकार आणि त्याचा आशय हे आताच्या पिढीला पसंत पडणं आव्हानात्मक होतं. नवीन रूपात, नव्या संचात, नव्या कलाकारांसह हे नाटक पुन्हा रंगभूमीवर मला आणता आलं आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवता आलं यातच मला आनंद आहे.

Read More
Recent Posts
Forensic Accountant म्हणजे काय? Fraud Refund Success Rate का कमी आहे? – अपूर्वा जोशी यांची कहाणी
Jul 08, 2025
“Dementia रुग्णापेक्षा घरच्यांना छळतो”
Apr 11, 2025
बाजीप्रभू जिवंत करणारे अजय पूरकर
Mar 25, 2025
CA RACHANA RANADE : Financial Decision फक्त पुरुषच घेऊ शकतात, हे कोणी ठरवलं?
Dec 16, 2024
समान नागरी कायदा ! पुन्हा चर्चेत..
Jun 24, 2023
Happy Birthday रेल्वे! #indianrailwayday
Apr 17, 2023
एका गझलकाराचा जन्म दिवस
Apr 14, 2023
कविता अन् बरंच काही...
Mar 27, 2023
राजामौली दिग्दर्शित RRR या सिनेमातील ‘Natu Natu’ गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
Mar 24, 2023
नाटकापलीकडच्या चारचौघी | Charchaughi | Part 1
Mar 27, 2023
MOST POPULAR
Here is the image

Forensic Accountant म्हणजे काय? Fraud Refund Success Rate का कमी आहे? – अपूर्वा जोशी यांची कहाणी

Jul 08, 2025
Here is the image

“Dementia रुग्णापेक्षा घरच्यांना छळतो”

Apr 11, 2025
Here is the image

बाजीप्रभू जिवंत करणारे अजय पूरकर

Mar 25, 2025
Here is the image

CA RACHANA RANADE : Financial Decision फक्त पुरुषच घेऊ शकतात, हे कोणी ठरवलं?

Dec 16, 2024
Here is the image

समान नागरी कायदा ! पुन्हा चर्चेत..

Jun 24, 2023
Here is the image

Happy Birthday रेल्वे! #indianrailwayday

Apr 17, 2023
Here is the image

एका गझलकाराचा जन्म दिवस

Apr 14, 2023
Here is the image

कविता अन् बरंच काही...

Mar 27, 2023
Here is the image

राजामौली दिग्दर्शित RRR या सिनेमातील ‘Natu Natu’ गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Mar 24, 2023
Here is the image

नाटकापलीकडच्या चारचौघी | Charchaughi | Part 1

Mar 27, 2023

आरपार म्हणजे डायरेक्ट भिडणारं चॅनेल . जगाच्या कानाकोपर्यात काहीही घडो, ‘आरपार’ बघितलं, कि पॉझिटिव्ह गोष्टीच दिसतात. आजूबाजूच्या धावत्या जगाला जो घाबरला, तो संपला. आपण तर बाबा ह्या असल्या जगाच्या नाकावर टिच्चून उभे राहून ,नॉस्टॅल्जियाचा प्रवास एन्जॉय करतो. कारण आपला फंडा क्लियर आहे.

Creative Posts

गुढी पाडवा म्हणजे एक नवी वासंतिक सुरुवात...
March 27, 2023, 6:24 p.m.
जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा...
March 27, 2023, 6:25 p.m.
घंटारव = ??
March 2, 2023, 1:10 p.m.

Quick Links

  • Home
  • About us
  • Videos
  • Blogs
  • Events
  • Contact Us
All Rights Reserved By © Aar Paar 2023 | Made with ❤️ By Sharp Multimedia