Happy Birthday रेल्वे! #indianrailwayday
Apr 17, 2023
लोकल ट्रेन, रेल्वे ही केवळ मुंबईकरांच्या नाही तर संपूर्ण भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कमीत कमी पैशात आणि वेगात आपल्या इच्छित ठिकाणी जाण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे रेल्वे. आज १६ एप्रिल. याच दिवशी १८५३ रोजी भारतात पहिली प्रवासी ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. या प्रवासी ट्रेन मध्ये त्यावेळी ४०० लोकांनी प्रवास केला होता. या ट्रेन ने सव्वा तासात ३४ किलोमीटर अंतर पार केले होते. विशेष म्हणजे त्यादिवशी चक्क सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. चला तर मग याच निमित्ताने जाणून घेऊया भारतीय रेल्वे संदर्भात काही मजेशीर आणि खास गोष्टी.
भारतात जगातील ४थं मोठं रेल्वेचं जाळं आहे. अमेरिका, चीन आणि रशिया नंतर भारताचा नंबर लागतो. भारतीय रेल्वे संबंधात काही interesting गोष्टी.
१. भारतातील सर्वात मोठं नाव असलेलं रेल्वे स्टेशन - वेंकटनारसिम्हाराजुवरिपेटा. हे आंध्र प्रदेशमधल्या चित्तूर जिल्ह्यातील तामिळनाडू सीमेवर आहे.
२. सर्वात छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन - इब
ओडिशातील झारसुगुडा इथे हे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर केवळ दोनच फलाट आहेत आणि गाड्या ही केवळ २ मिनिटं थांबतात
३. मथुरा हे देशातलं सगळयात मोठं जंक्शन आहे.
४. हावडा हे सगळयात व्यस्त रेल्वे जंक्शन आहे
५. रेल्वे स्टेशन वर स्टेशनचं नाव काळ्या पिवळ्या अक्षरात लिहिलेलं असतं, कारण पिवळा रंग हा प्रकाश परावर्तित करणारा रंग आहे. त्यामुळे लोको पायलटला दूर अंतरावरूनही स्टेशनचं नाव दिसतं. रात्रीच्या वेळीदेखील अंधारातही हा पिवळा रंग स्पष्ट दिसतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिले जाते.
६. रेल्वेस्टेशनवरील बोर्ड वर समुद्र सपाटीपासून उंची लिहिलेली असते कारण याचा फायदा रेल्वेच्या ड्रायव्हरला होतो.
समजा, एखादी रेल्वे 100 मीटर समुद्र सपाटीच्या उंचीवरून 200 मीटर समुद्र सपाटीच्या उंची पर्यंत जात असेल तर ड्रायव्हरला निर्णय घेण्यास सोपे जाते. तो निर्णय घेऊ शकतो की, 100 मीटर अधिक चढासाठी त्याला इंजिनला किती पॉवर द्यावी लागेल.
जर रेल्वे खालच्या दिशेने येत असेल तर ड्रायव्हरला किती ब्रेक लावावा लागेल आणि किती वेग ठेवावा लागेल या सर्व गोष्टींसाठी रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिली जाते.
याशिवाय समुद्र सपाटीपासूनच्या उंचीच्या मदतीने रेल्वेच्या वरती लागलेल्या विजच्या तारांना एकसमान उंची देण्यास मदत होते. जेणेकरून, विजेच्या तारा ट्रेनशी प्रत्येक वेळेस जोडलेल्या असतील.
७. सेंट्रल, जंक्शन आणि टर्मिनस मधला फरक काय?
जंक्शन (Junction)
जर एखाद्या रेल्वे स्थानकाच्या नावापुढे जंक्शन लिहिले असेल, तर याचा अर्थ या स्थानकावर ट्रेन येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकापेक्षा जास्त मार्ग आहेत. म्हणजे एखादी गाडी एका मार्गावरून येत असेल तर ती दोन मार्गांनीही जाऊ शकते. उदा - कल्याण
सेंट्रल (Central)
काही रेल्वे स्थानकांच्या नावापुढे सेंट्रलही लिहिलेले असते. म्हणजे त्या शहरात अनेक रेल्वे स्टेशन आहेत आणि ज्या स्टेशनच्या पुढे सेंट्रल लिहिले आहे ते त्या शहरातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे. तसेच, जर एखाद्या रेल्वे स्थानकाच्या नावासमोर सेंट्रल लिहिले असेल, तर त्याचा अर्थ ते स्थानक त्या शहरातील सर्वात व्यस्त स्थानक आहे.
उदा - मुंबई सेंट्रल
टर्मिनस
अशीही काही रेल्वे स्थानके आहेत ज्यांच्या नावापुढे टर्मिनस लिहिलेलं असतं. याचा अर्थ ट्रेन ज्या दिशेला येते, त्याच बाजूने परत जाते. म्हणजे त्या स्थानकासमोर रेल्वे ट्रॅक नसल्याने गाडी पुढे जाऊ शकत नाही.
उदा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट टर्मिनस
८. भारतातील रेल्वे स्टेशन्सची काही मजेशीर नावं
* साली - जोधपूर (राजस्थान)
* दिवाना - पानिपत (हरियाणा)
* दारू स्टेशन - हजारीबाग (हरियाणा)
* बिल्ली जंक्शन - सोनभद्र (उत्तर प्रदेश)
* बाप - जोधपूर (राजस्थान)
* काला बकरा - जालंधर (पंजाब)
* सुअर - रामपूर (उत्तर प्रदेश)
* कुत्ता - कूर्ग (कर्नाटक)
* ओढनिया चाचा - जोधपूर (राजस्थान)
९. सिंहाबाद हे भारतातील सर्वात शेवटचं रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजांच्या काळात हे स्टेशन जसं होतं आजही ते त्याच रुपात आहे. सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील मलादा जिल्ह्यातील हबीबपूरमध्ये आहे. तर हे रेल्वे स्टेशन बांगलादेशच्या सीमला लागून आहे. या रेल्वे स्टेशनवर मालगाड्या ठेवल्या जात होत्या. त्यामुळे या स्टेशनवर लोकांची रहदारी कमी आहे. बांगलादेश या स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. सिंहाबाद या रेल्वे स्टेशनने आपली इंग्रजांच्या काळातील ओळख आजही तशीच जपली आहे. इंग्रजांच्या काळात असलेले सिग्नलसुद्धा तसेच आहेत. मजेशीर म्हणजे कार्डबोर्डवाले तिकीटही आजही या स्टेशनवर मिळतात. गंमत म्हणजे इंग्रजांच्या काळातील टेलिफोन पण इथे पाहिला मिळतो.
१० दिब्रुगढ आणि कन्याकुमारी दरम्यान धावणारी विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ते सुमारे 82 तासात 4,000 किमी पर्यंतचे अंतर कापते.
तर मेट्टुपालयम-उटी निलगिरी प्रवासी ट्रेन ही भारतातली कमी वेगाने धावणारी ट्रेन आहे. ताशी १० किलोमीटर इतका तिचा वेग आहे.
११. नवापूर हे एक असं स्टेशन आहे, जे अर्ध महाराष्ट्रातल्या नंदुरबार मध्ये आहे, आणि उर्वरित अर्ध स्टेशन हे गुजरातमधील तापी जिल्ह्यातील उच्छल मध्ये आहे.