नाटकापलीकडच्या चारचौघी | Charchaughi | Part 1
Mar 27, 2023
चारचौघी... तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं नाटक... आता तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा या नाटकाने रंगभूमीवर दमदार एन्ट्री घेतली आहे... या नाटकाचा आशय जितका परखड तितक्याच दर्जेदार त्यातील या चौघी नायिका... रोहिणीताई हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे अशा वेगवेगळ्या पिढीचे प्रतिनिधत्त्व करणाऱ्या या चारचौघींपेक्षा वेगळ्या असणाऱ्या चौघींचे आरपार विचार आम्ही ऐकले आणि आता ते तुमच्यासमोर दोन भागात सादर करत आहोत... यासोबतच नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी यांचेही या नाटकामागचे विचार आपण जाणून घेतले आहेत...
१. तुम्ही इतकी वर्ष काम करताय, वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करताय, या नाटकाच्या निमित्ताने तुमच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या पर्ण, मुक्ता, कादंबरी यांच्यासोबत स्टेज शेअर करताय... या सहकलाकारांबद्दल काय सांगाल? त्यांच्याकडून कोणती गोष्ट शिकावी असं वाटतं?
रोहिणीताई - यापूर्वी तिघींबरोबर काम करण्याची संधी नव्हती आली, पण या तिघींची कामं चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये मी बघत होते. पण एकत्र काम करण्याचा योग या चारचौघी नाटकामुळे आला. आम्ही तिघी पहिल्यांदा काम करतोय असं अजिबात वाटत नव्हतं, कारण खूप पटकन आम्ही सगळ्याजणी मिसळून गेलो... त्यामुळे तालमीही रंगल्या. मुक्ताकडून खूप शिकण्यासारखं आहे. मला खूप रिहर्सल्स कराव्या लागतात, तरंच माझं पाठांतर होतं. घरी बसून माझं कधीच पाठ होत नाही. पण मुक्ताचं जे पाठांतर आहे, ते आम्ही सगळ्यांनीच तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. या नाटकात तिचा २० मिनिटांचा फोन कट आहे, तो ती ज्या पद्धतीने सादर करते, त्याने आम्ही भारावून जातो. रिहर्सलमध्ये हा फोनकट आम्ही ऐकलाच नव्हता, कारण मुक्ताच्या एकटीचा फोनकट असल्याने तो घरी जाऊन पाठ करेल, आपण पुढची तालीम करू असं होत असल्याने, प्रत्येकवेळी आम्ही तो स्कीप करायचो. संपूर्ण नाटक बसल्यानंतर आम्ही तिचा तो सीन बघितला आणि तिने तो अस्खलितपणे सादर केला. तर तिची ही पाठांतराची उत्तम सवय तिच्याकडून अगदी घेण्यासारखी आहे. पर्ण आमची ‘बबली गर्ल’ होती. आमच्या सगळ्यात ती सर्वात जास्त उत्साही मुलगी होती, आणि ती कधीही प्रॅक्टीस करायला तयार असायची. आम्ही दोघींनी आमचे काही सीन्सची रिहर्सल तर फोनवर केलेली आहे. मी दुसऱ्या शूटिंगला जायचे, तेव्हा आम्ही कित्येकदा फोनवर रिहर्सला केलेल्या आहेत. अशाप्रकारे या मुलींकडून शिकण्यासारखं बरंच आहे, जे मी हळू हळू शिकतेय.
२. मुक्ता तुझी या नाटकातील भूमिका ही एका स्ट्राँग महिलेची आहे... सध्याच्या जगात वर्किंग कपल आपल्याला खूप दिसतात, मात्र घरी आल्यावर ती बाईच वर्किंग असते, पुरूष घरचं काम करेलच असं नाही... तर या परिस्थितीबद्दल तू काय सांगशील?
मुक्ता – हे नाटक लिहिलं गेलं तो काळ बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. पण आताच्या जनरेशनमधल्या जोडप्यांची परिस्थिती बरीच सुधारली आहे. आताच्या काळात घरी आल्यावर बाईच काम करते, अशी सिच्युएशन बघायला मिळत नाही, बरीचशी कामं वाटून घेतली जातात. एकमेकांची गरज ओळखून घरातली कामं केली जातात. पण मागच्या जनरेशनमध्ये हे ठरलेलं असायचं की कितीही दमून बाई घरी आली, तरी खिचडी टाकायला बाईच उठणार. थोडीशी खिचडी चालेल असं म्हणत घरातील पुरूष आपला मोठेपणा दाखवतो. पण आता जसा काळ बदलतोय तशा गोष्टी बदलत जातायत. पण परिस्थिती आली की बाईनेच आधी कामाला उठायचं हा अलिखित नियम पूर्वी होता, म्हणजे कोणी आलं तर चहा टाकायला पटकन बाईच उठणार. पण या गोष्टी हळू हळू बदलत आहेत. मला असं वाटतं की बाईची कपॅसिटी जास्त असते, म्हणून बायका जबाबदाऱ्या घेऊ शकतात. बाई मल्टिटास्किंग असते... माझ्याकडे एक खूप छान उदाहरण आहे या बाबतीत... मी ‘आम्ही दोघी’ नावाची फिल्म केली होती. त्याची दिग्दर्शिका आणि लेखिका दोघीही महिला होत्या. आतापर्यंत काम केलेला पहिला असा सेट मी बघितला जिथे वेळेत लंच ब्रेक व्हायचा आणि वेळेत पॅकअप व्हायचं, आणि सेटवरचा प्रत्येक मेंबर जेवलाय का हे विचारलं जायचं. काही काही जण म्हणतात की, तो खूप पॅशनेट दिग्दर्शक आहे, त्याला जेवायचं पण भान राहात नाही... पण मी म्हणते हा वेडेपणा आहे. जेव्हा तुम्ही जेवत नाही तेव्हा तुमचा लाईटमनही जेवलेला नसतो, त्याचा त्याचा कामावर परिणाम होतो... त्यामुळे या बारीकसारीक गोष्टी बायका खूप उत्तमपणे सांभाळू शकतात, तेवढी त्यांची कपॅसिटी असते. याच नाटकाच्या सेटवर आम्ही रोहिणीताईंच्या रूपात हे बघतोय की, या वयातह त्या अत्यंत उत्साही असतात. आम्हीच त्यांना म्हणायचो की, ताई जरा पडता का, पण त्या कधीच थकलेल्या मी बघितल्या नाहीत. सत्तरीतही तीन तासाचे दोन प्रयोग बॅक टू बॅक करणं हे सोपं नाहीय. त्यांची डायलॉग डिलिव्हरी ऐकायला खास प्रेक्षक येतात. अभिनेत्री म्हणून त्या उत्तम आहेतच, पण माणूस म्हणूनही आम्ही त्यांना अगदी जवळ बघतो... मला मोठेपणी रोहिणीताईंसारखं वाटतंय. त्यांच्या कपॅसिटीला तोड नाही. त्यामुळे मी म्हणने की बायकांवर जबाबदारी येऊन पडत नाही, तर ती जबाबदारी त्याच घेऊ शकतात.
३. एका वृत्तपत्रात असं आलं होतं की सध्याची चाळीशी म्हणजे सत्तरी आहे... सध्याच्या पिढीत तिशीतच महिलांना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत... पण स्त्रिया मल्टिटास्किंग असतात, तर तू याबद्दल काय सांगशील?
कादंबरी – मला वाटतं आताची चाळीशी म्हणजे अगदी विशी-पंचविशी आहे. तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कसे वागता. तुम्ही स्वतःला आव्हानं देणं बंद केलं तर आयुष्य कायम उदासच वाटेल. त्यामुळे तुमचा दृष्टीकोन कसा आहे, त्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. माझा चाळीसावा वाढदिवस आणि माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस हा एकाद वर्षात आला... पण मला यात काहीच वावगं वाटत नाही. Age is just a number. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याची वैयक्तिक लढाई चालूच असते. त्यामुळे पूर्वी ज्यापद्धतीने एकमेकांना नावं ठेवली जायची त्याचं प्रमाण आता कमी झालंय. मल्टिटास्किंगबाबत सांगायला गेलं तर बायका सक्षम असतात त्यामुळेच विविध कामं करू शकतात. पण मी माझ्या मुलाच्या बाबतीत जरा वेगळा विचार करायला करते. मी त्याला भातुकलीचा सेट आणलाय, मी त्याला खेळायला बाहुली देते. त्यामुळे काही कामं बाईची, काही कामं पुरूषांची असं त्याला लहानपणापसूनच वाटू नये. सगळी कामं समान आहेत, आणि दोघांनी मिळून ती करायची असतात असेच संस्कार त्याच्यावर लहानपणापासून व्हायला हवेत.
४. नाटकांना पुनरूज्जिवीत करणारा ब्रँड म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर... सर नाटक ३१ वर्षांनी पुन्हा एकदा रंगमंचावर सादर होतंय, काय सांगाल याबद्दल?
चंद्रकांत कुलकर्णी – चारचौघी हे नाटक काळाच्या पुढचं आहे हे ३१ वर्षांपूर्वी बोललं गेलं होतं. एक आशयसंपन्न नाटक दशकाच्या सुरवातील येणं आणि ते प्रचंड लोकप्रिय होणं हे पुढील आशयसंपन्न नाटकांसाठीची नांदी होती. बदलणाऱ्या स्त्रीचं चित्र या नाटकात दाखवलं होतं, त्यामुळे स्त्री चळवळीला, प्रेक्षकांना, अभ्यासकांना जवळचं वाटलं होतं. काळाच्या पुढचं कथानक या नाटकात मांडलं होतं त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस ठरलं. मला खूप जणांकडून मागणी येत होती की चारचौघी पुन्हा करा... मी दोन गोष्टींचा विचार करत होतो की त्या तोडीचे कलाकार आणि त्याचा आशय हे आताच्या पिढीला पसंत पडणं आव्हानात्मक होतं. नवीन रूपात, नव्या संचात, नव्या कलाकारांसह हे नाटक पुन्हा रंगभूमीवर मला आणता आलं आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवता आलं यातच मला आनंद आहे.