राजामौली दिग्दर्शित RRR या सिनेमातील ‘Natu Natu’ गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
Mar 24, 2023
आपल्याकडे लोकांना नाक हा अवयव गंध घेण्यासाठी नाही, तर मुरडण्यासाठीच आहे असं वाटतं की काय? असा प्रश्न पडलाय. थेट मुद्यावरच येऊ… १३ मार्च २०२३ हा दिवस भारतीय सिनेविश्वासाठी सुवर्ण दिवस होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस. कारण ‘The Elephant Whisperers’ या डॉक्यूमेंट्रीला आणि एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या सिनेमातील ‘Natu Natu’ गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘जय हो’ नंतर असलेली कित्येक वर्षांची प्रतीक्षा नाटू नाटू ने संपवली. वास्तविक जेव्हा आर.आर.आर. सिनेमाचा ऑस्कर नामांकनाच्या यादीत समावेश झाला, तेव्हाच अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. कारण तो सिनेमा मुळातच तेवढ्या ताकदीने बनवण्यात आला होता. त्यातल्या नाटू नाटू गाण्याने थिएटरपासून इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला होता. प्रचंड एनर्जी, अफाट कोरिओग्राफी, साधे पण लक्ष वेधून घेणारे शब्द आणि डोक्यात रेंगाळणारी चाल या सगळ्याच आघाड्यांवर हे गाणं यशस्वी झालं, आणि ऑस्कर अॅवॉर्डने त्यावर शिक्कामोर्तब केलं. अर्थात् गेल्या काही दिवसातला दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा प्रवास, त्यांनी दिलेले दर्जेदार सिनेमे पाहिल्यावर पुढचा ऑस्कर एखादा दाक्षिणात्य सिनेमाचं भारतात घेऊन येईल याची मनोमन खूण पटली होती.
ऑस्करची अनाउंन्समेंट झाली, आणि इथे सोशल मिडीयावर पोस्ट्सचा पूर आला. अनेकांनी अभिनंदन केलं, आनंद व्यक्त केला, आणि काहीजणांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून टिका केली. टीकाकारांच्या पोस्ट आणि त्यातले विचार वाचून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली. एका ताईंनी पोस्ट केली होती, वाट्टेल तसे हातपाय झाडून नाचू नाचू करण्याला ऑस्कर मिळत असेल, तर आमच्या गल्लीतल्या तळीरामालाही मिळायला हवा. बरं या ताई निवृत्त प्राध्यापिका, फिल्म मेकर, ज्युरी मेंबर फॉर फिल्म्स अँड थिएटर. त्यांची ती पोस्ट बघून फार वाईट वाटलं. सिनेअभ्यासक असूनही इतक्या ताकदीचं गाणं बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील याची जाणीवही त्यांना असू नये? वाट्टेल तसे हातपायचं झाडायचे आहेत ना, मग ते फेसबूकवर झाडण्यापेक्षा, त्यातली एखादी स्टेप करून दाखवा, अशी कमेंट करण्याचा मोह मी आवरता घेतला.
मदर इंडियाला ऑस्कर नाकारताना लॉट ऑफ मड अँड ब्लड असं म्हटलं गेलं, म्हणून आमचं रक्त उसळलं होतं. लगान सिनेमाला ऑस्कर मिळाला नाही, तेव्हा गोऱ्यांचा पराभव जिव्हारी लागला असेल म्हणून दिला नाही अशा बोंबाही आम्ही मारल्या. स्लमडॉग मिलेनियर हा सिनेमा पूर्णतः भारतीय सिनेमा नव्हता, त्यामुळे त्यातही आम्हाला परिपूर्ण आनंद झाला नाही आणि त्यावर पाश्चिमात्यांना अपेक्षित गरीब भारत दाखवला म्हणून पुरस्कार मिळाला अशीही कुजबूज झाली. अखेरीस तो परिपूर्ण आनंद आपल्याला नाटू नाटू गाण्याने मिळवून दिला. ऑस्करच्या ‘बेस्ट ओरिजनल साँग’ या कॅटेगरीत नाटू नाटू ने आपला ठसा उमटवला, आणि अनेक भारतीयांना पोटशूळ उठला. अनेकांनी तर ‘फालतू गाणं’ असा शिक्का त्यावर मारला. हास्यास्पद म्हणजे भारतात आपले प्रॉडक्टस् विकायची स्ट्रॅटेजी सुरु झाली अशीही आरोळी अनेकांनी सुरु केली. असं अरण्यरुदन करणाऱ्यांना पु.लं. च्या भाषेत उत्तर द्यावंसं वाटतं, ‘आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय? एकूण कर्तृत्व काय? याचा विचार न करता मत मांडायचं, म्हणजे आपण महानगरपालिकेच्या उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असलो, तरीही अमेरिकेचे आर्थिक धोरण यावर मत ठोकून द्यायचं.’ या असल्या कॅटेगरीत या माणसांची गणना होते.
‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिलंय, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत गीतकार चंद्रा बोस यांनी, १९ महिने ते या गाण्यावर काम करत होते. एस.एस. राजामौली यांना असं एक गाणं सिनेमात हवंच होतं, जे प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावेल आणि थिरकायला भाग पाडेल. रामचरण आणि ज्युनिअर एन.टी.आर. हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले उत्तम डान्सर्स, त्यामुळे त्यांच्या या कलेचा आविष्कार दाखवता येईल असं गाणं तू मला दे अशी राजामौली यांनी एम.एम. कीरवाणी यांना गळ घातली, आणि त्यानुसार गाणं लिहिण्यासाठी किरवाणी यांनी चंद्र बोस यांना आग्रह केला. या सिनेमात भीम अर्थात् ज्युनिएर एन.टी.आर हा तेलंगणाचा आहे आणि राम म्हणजेच रामचरण हा आंध्रप्रदेशचा. सिनेमातलं गाणं कालसुसंगत वाटावं म्हणून चंद्रा बोस यांनी १९२० साली तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बोली भाषेत जे शब्द वापरले जायचे त्या शब्दांचा अंतर्भाव या गाण्यात केलेला आहे.
हे गाणं मातीतलं आहे, प्रत्येक शब्दात रांगडेपणा आहे. या गाण्यातले शब्द तेलुगु आहेत. नाटू या शब्दाचा सरळ सोपा अर्थ म्हणजे ‘नाचा’ पण नाचा असं सांगताना कसं नाचा हे सुद्धा वेगवेगळ्या उपमा देऊन या गाण्यात सांगितलं आहे. कसं नाचा तर उधळलेल्या उन्मत्त बैलासारखं, नाचा कसं, तर हिरव्या मिरचीच्या ठेच्याच्या चटक्यासारखं, नाचा कसं तर खोलवर रुतणाऱ्या कट्यारीच्या धारेसारखं, अंगावर आसूड ओढून नाचणाऱ्या पोतराजासारखं, वडाच्या झाडाखाली जमलेल्या पोरांसारखं नाचा. ही सगळी उदाहरणं, उपमा अस्सल भारताच्या मातीतल्या आणि सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारातल्या आहेत. या गाण्यात जेवढा वाटा संगीत आणि नृत्याचा आहे, तेवढाच तो या शब्दांचा देखिल आहे.
प्रेम रक्षिथ यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या संपूर्ण गाण्यासाठी त्यांनी एकूण ९५ स्टेप्स डिझाईन केल्या आणि जी सिग्नेचर स्टेप होती, जिने इन्स्टाग्रामवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्या स्टेपसाठी एकूण ३० वेगवेगळ्या स्टेप डिझाईन केलेल्या होत्या. या गाण्याचं संपूर्ण शूटींग युक्रेनची राजधानी किव्ह मध्ये झालंय. त्या दिवसात किव्हमध्ये प्रचंड उन्हाळा होता, सकाळी ६ वाजता सूर्योदय होऊन रात्री ८ वाजता सूर्यास्त व्हायचा आणि अशा तळपत्या उन्हात या गाण्याचे एकूण १८ टेक झाले, विथ सेम एनर्जी आणि पेस. प्रत्येक बीटसोबत स्टेप मॅच होण्यासाठी राजामौली प्रचंड आग्रही असायचे. जोवर मनासारखं होत नाही तोवर थांबायचं नाही असा चंग प्रत्येकाने बांधला होता, जीव ओतून मेहनत घेतली होती, आणि त्यानंतर काय झालं याचे आपण प्रत्येकजण साक्षीदार आहोत.
एक सिनेमा बनवण्यासाठी हजारो हात कष्ट घेत असतात, गाणं हा भारतीय सिनेसृष्टीचा अविभाज्य भाग आहे. गाण्यांच्या जोरावर सिनेमा हिट झाल्याची कितीतरी उदाहरणं भारतीय सिनेमाने पाहिलेली आहेत. असं म्हणतात एक गाणं अनेक पिढ्यांना जोडून ठेवतं, एक गाणं पुढची कित्येक वर्ष तुम्हाला संस्कृतीशी बांधून ठेवतं, भारतीय समाजजीवनातील गाण्यांचं हे महत्त्व पाहिलं की आर.आर.आर. सिनेमात एस.एस.राजमौली, एम.एम.किरवाणी, चंद्र बोस, प्रेम रक्षिथ, रामचरण, ज्युनिअर एन.टी.आर. यांनी नाटू नाटू गाण्यासाठी इतकी मेहनत का घेतली ते कळतं. आज या सगळ्यांनी आपली मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांना एवढचं सांगावसं वाटतं ‘दोस्तों मेहनत रंग लायी.’
बाकी मान्यवरांचे आभार, विजेत्यांचं अभिनंदन आणि टीकाकारांना प्रेमाचा सल्ला ‘डोळे तपासून घ्या, सारखं काहीतरी डोळ्यात खुपणं बरं नाही’
- बंबईवाली
#natunatu #rrr #oscar #originalsong #academyawards #oscarawards #nachonacho #aarpaar #aarpaarblog #bambaiwali