“Dementia रुग्णापेक्षा घरच्यांना छळतो”
Apr 11, 2025
“Dementia रुग्णापेक्षा घरच्यांना छळतो”
असं म्हणतात की माणसाला या पृथ्वीवर इतर जीवजंतूंपासून वेगळे बनवतं ते म्हणजे त्याचं डोकं. विचार करण्याची क्षमता निसर्गाने फक्त माणसाला दिली. सातत्याने स्वतःमध्ये बदल करत करत पृथ्वीवरचा सगळ्यात बलशाली जीव आज माणूस आहे, तोही फक्त त्याच्या बुद्धीच्या जोरावर. पण निसर्गाने एक छोटासा loophole त्यात सोडला! कमाल आहे खरंच, इतकी तीक्ष्ण बुद्धी, डोक्यातल्या विचारांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. पण याच बुद्धीला विस्मृती सुद्धा दिली.
एकाच वेळी कसं निसर्गाने माणसाला ब्रह्मत्व आणि लाचारी दिली असेल. याच विस्मृतीचा अतिरेक झाला की त्याला Dementia असं म्हणतात. हा एक आजार आहे जो बरा होत नाही. या आजाराच्या अंतर्गत अनेक आजार आहेत - Alzheimer's, Lewy Body Dementia, Vascular Dementia इत्यादी. स्मिता अभ्यंकर या counselor आणि psychologist आहेत. स्मिता गेल्या अनेक वर्षांपासून Alzheimer's च्या रुग्णांची counseling करतात आणि त्यांच्या अडचणी समजून त्यांचा पॅटर्न समजून घेतात, जेणेकरून त्या रुग्णांच्या घरच्यांना मार्गदर्शन करू शकतील रुग्णाची काळजी घेण्यात. कारण ह्या आजारात रुग्ण स्वतःच्या घरच्यांनाही ओळखणं बंद करतो, म्हणून त्यांची काळजी घेणं अजून कठीण होऊन जातं.स्मिता अभ्यंकर यांनी 'आरपार' कॅफेवर झालेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. नेमका हा Alzheimer’s असतो काय, ह्याला कसं ओळखावं, अनेक गोष्टी. ह्या आजारात रुग्ण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखणं बंद करतो. बऱ्याचदा असं होतं की फक्त जुन्या आठवणी लक्षात राहतात आणि वर्तमानातील गोष्टी लक्षात राहत नाहीत. हा आजार बहुधा वृद्धावस्थेत होतो. पण स्मिता अभ्यंकर म्हणतात की हल्ली हे होण्याचं वय हळूहळू कमी होत आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे. ह्या आजारात रुग्णापेक्षा त्यांचे घरचे खूप काही सहन करतात, त्यामुळे त्यांच्या घरच्यांना धीर देणं आणि संपूर्ण माहिती देणं हे गरजेचं असतं, असं स्मिता म्हणतात. मुळात हा आजार इतर आजारांसारखा नाही, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. ह्यात रुग्ण चालतो, बोलतो, पण कोणत्या क्षणी काय करेल, कोणाला आपलं मानेल किंवा कोणाला घाबरेल, ह्याचा नेम नसतो. ह्या आजारात रुग्णांना भास होतात, ते स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करून त्यात राहत असतात, आणि जर आपण त्यांच्या एखाद्या गोष्टीचा विरोध केला तर ते कसं वागतील ह्याचा काही अंदाज नसतो. ही पूर्णपणे मानसिक स्थिती आहे, पण बहुधा लोक ह्यांना वेडं समजायला लागतात. आणि त्यांच्या ह्या वागण्यामुळे त्यांना मानसिक रोगी समजून त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होतात आणि खूप उशिरा हे कळतं की त्यांना Dementia आहे.
https://youtu.be/8rp0ANPd-mE?si=IkflaIQN0szs8FDN
मुलाखतीत स्मिता अभ्यंकर यांनी बरेच किस्से सांगितले की हे रुग्ण कसं वागतात, जर चिडले तर काय काय करतात. पण ह्या रुग्णांकडे कोणी लक्ष देत नाही, ह्याची खंत व्यक्त करत स्मिता म्हणतात की अशा रुग्णांच्या घरचे त्यांना वैतागून शेवटी शेवटी त्यांना ऐकत सोडून देतात. आणि ह्या रुग्णांना सगळ्यात जास्त धोका एकटं राहण्यापासूनच आहे. त्या सांगतात की lockdown मध्ये त्यांनी बरेच रुग्ण गमावले फक्त एकटे पडल्यामुळे. ह्या आजाराचा उपाय नाही, आपण या आजाराला पूर्णपणे बरं करू शकत नाही, पण कमीत कमी आपण रुग्णासोबत थोडा वेळ घालवू शकतो. त्यांना काय हवं-नको, त्यांची काळजी घेऊ शकतो. विस्मृती त्यांना झालीय, पण आपल्या तरी लक्षात आहे ना! हा आजार झालेली व्यक्ती माझी आई आहे, बायको आहे, किंवा वडील आहेत, कोणीही असू शकतं.हीच गोष्ट समजावण्यासाठी स्मिता अभ्यंकर आणि त्यांच्या दोन मैत्रिणी मिळून हे काम करत आहेत. ह्या आजारात रुग्णांच्या घरच्यांना ते तयार करतात ह्या आजाराशी दोन हात करायला. त्यांचं असं म्हणणं आहे की मानसशास्त्रात कधीच वृद्ध व्यक्तींच्या मानसिकतेकडे किंवा त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे.
वय वाढलं की विसरायला होतंच, असा समज होऊन बसला आहे. पण ह्यामुळेच Dementia सारखा आजार लवकर निदर्शनास येत नाही आणि ह्यामुळेच पुढे अजून अडचणी वाढतात. एकंदरीत ह्या विषयाचा सार एवढाच आहे की एक तर कोणत्याही प्रकारचा Dementia दुर्लक्ष करू नका, आणि ह्या आजाराच्या रुग्णांसोबत शक्य तितकं नरम वागा. त्यांना वेळ द्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं... अशा अवस्थेत रुग्ण एकटे पडणार नाहीत, ह्याची काळजी घ्या.ह्या आजाराबद्दलची अजून माहिती मिळवायची असेल तर 'आरपार' YouTube चॅनेलवर ही संपूर्ण मुलाखत नक्की बघा.