एका गझलकाराचा जन्म दिवस
Apr 14, 2023
एखादा कवी जेव्हा जन्माला येतो, म्हणजे नक्की काय होतं? त्याच्या जन्माच्या वेळी आईला नेमक्या काय यातना होत असतील? त्याही पेक्षा नेमके काय डोहाळे लागले असतील तिला? पहाटेच्या किरमिजी प्रकाशात प्राजक्ताच्या खाली उभं राहून, सडा अलगद पदरात झेलावा असं वाटत असेल का तिला? घरात रांधत असताना खिडकीबाहेर कोकीळेचे कूजन ऐकून, तिलाही बेंबीच्या देठापासून - ‘कुहूsss‘ करावसं वाटलं असेल का? किंवा ग्रीष्मातल्या पानगळतीत सरपण गोळा करत असताना तिची नजर कुठेतरी मोरपीस शोधत असेल का? - माहिती नाही!
जेव्हा कवी पाळण्याच्या हिंदोळ्यात हातपाय झाडत छत बघत असेल, तेव्हा त्या चंचलतेत त्याचे डोळे अधिक बाणेदार दिसत असतील का? किंवा माय जेव्हा स्वतः घामाने डबडबून ऐन दुपारी त्याला पदराने वारा घालत असेल, तेव्हा घामाचा ओघळ त्याच्या गालावर पडून त्याची झोप उडत असेल का/त्याचं अंग पोळत असेल का? माहिती नाही...
ह्या सगळ्या गोष्टी फारच अतिशयोक्तिकच्या आहेत, हे पटतंय. पण प्रश्न तोच राहतो, की - एका कवीचा जन्म होतो म्हणजे नक्की काय होतं? खरंतर ह्याचं उत्तर कवीलाही माहिती नसतं. तो त्याच्या अस्तित्वाबद्दल फक्त ठोकताळे बांधतो. उदा. तो कधी पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले चितेवरी लोक जे नको ते रडून गेले असं म्हणून एक प्रकारे शोक व्यक्त करतो, तर कधी
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.
असे म्हणून एक प्रेरणेचा झळाळ स्वतःत बघतो.
सुज्ञांना लक्षात आले असेलच की ह्या वरच्या ओळी सुरेश भटांच्या आहेत. ‘सुरेश भट’ हे नाव ऐकताच अनेक गझलांच्या ओळी कानात घुमतात. आणि त्यातल्या प्रत्येक ओळी त्यांचं असं स्वतःच अस्तित्व घेऊन आलेल्या असतात. एकासारखी दुसरी ओळ सापडणं शक्यच नाही. कधी ते
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
असे म्हणून अत्यंत उच्च दर्जाची अशी विरह भावना दाखवतात, तर कधी
अजून थांब, लागली जगास झोप आंधळी..
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी..
तुला-मला विचारुनी फुटेल आज तांबडे..!!
असे म्हणून आर्द्र प्रणय भावना असलेलले गीत लिहितात. ही माणसंच अशी ग्रेट आहेत, कि एकावेळी अनेक व्यक्तींचं जगणं ते जगत असतात. एक तुमचं आमचं जीवन त्यांच्या शाईतून झरत असत. अत्यंत संवेदनशील आणि विद्रोही स्वभाव आणि व्याकरणावर पूर्ण हुकूमत असलेल्या सुरेश भटांनी गझलेत अफाट विविधता आणली. हिंदी -उर्दूच्या तोडीस तोड वजन त्यांनी मराठी गझलेला प्राप्त करून दिले. त्यांनी पेटवलेली मराठी गझलेची ज्योत आजही अनेक जणांना गझलेचा मार्ग दाखवते आहे.
जरी ह्या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही…!!
असे आजच्या भाषेत #attitude मध्ये बोलणाऱ्या सुरेश भटांचा आज ९१ वा जन्म दिवस. गेले कित्येक दिवस त्यांची गझल पुढल्या पिढीशी संवाद साधतेच आहे. कविमनाने जन्माला आलेल्या अर्भकांना एक वाट उजेडात आणून देतीये, ज्यात बरेच काटे - खाच खळगे आहेत.
त्यामुळे कवी जन्माला येतो म्हणजे नक्की काय होतं हे आपल्याला कळेल तेव्हा कळों, पण तो पर्यंत अशा महान क्षणी जन्मलेल्या हातांचे तळवे आपल्या डोळ्यांना लावून जळजळ शांत करणं एवढंच आपल्या हाती आहे.